मुंबई- कोल्हापूर शहरातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि सुचित मिणचेकर यांनी कोल्हापूर शहरातील टोलप्रश्नावरून विधानसभेत गोंधळ घातल्याने त्यांना अधिेवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे.
क्षीरसागर आणि मिणचेकर यांनी सोमवारी विधानसभेत कोल्हापूर शहरातील टोलप्रश्न तत्काळ सोडवावा यासाटी स्थगन प्रस्ताव मांडला व तो लागलीच मंजूर करण्याची मागणी लावून धरली. मात्र, सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. आपली मागणी मान्य न केल्याने या दोन आमदारांनी विधानसभेत प्रचंड घोषणाबाजी सुरु केली. तसेच वेलमध्ये जाऊन टेबलावरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपसभापती वसंत पुरके यांनी या दोन्ही आमदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले.
दुसरीकडे, कोल्हापूर शहरात टोल वसुलीला विरोध कायम ठेवत टोल विरोधी कृती समितीने आज शहरात महामोर्चा काढला आहे. त्यामुळे कोल्हापूरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.