आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात काय चाललंय तेही पाहा! , उद्धव ठाकरेंनी खडसावले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खडबडून जागे झालेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी तातडीने ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी व आमदारांना ‘मातोश्री’वर पाचारण केले. दुस-या पक्षाचे लोक शिवसेनेत घेताना स्वत:च्या घरात काय सुरू आहे, याचीही किमान माहिती ठेवत जा, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक या दोन आमदारांना सुनावले.
आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीशी जवळीक करतानाच, बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आपल्याला आजही आदर असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी थेट टीका करण्याचे टाळले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारीच उद्धव ठाकरे यांनी परांजपेच्या नाराजीची कारणे आपल्या खास लोकांकरवी समजून घेतली होती. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत त्यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘जिल्ह्यातील शिवसेना आपल्याच जिवावर चालत आहे, असे कुणीही समजण्याचा प्रयत्न करू नये. आनंद परांजपे नाराज असून ते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, याची माहितीही तुम्हाला मिळू नये, याच्यासारखा गलथानपणा राजकारणात आणखी कोणता असू शकतो?,’ अशा शब्दात त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, परांजपे यांच्यावर कारवाई करण्याबाबत आत्ताच कोणताही निर्णय न घेण्याचे तसेच परांपजेंविरूध्द आंदोलन करताना शिवसैनिकांनी सबुरीचे धोरण स्वीकारावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच नाराज परांजपे यांच्याशी गुफ्तगू होऊ शकते का, याचीही चाचपणी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास ‘दूतां’ना दिले आहेत. मात्र या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेत्यांनी सांगितले की, आनंद परांजपे यांचा विषय कालच संपल्याने आज आम्ही त्याबाबत चर्चा केली नाही. ठाणे महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली.
परांंजपे यांच्याबाबत निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे घेतील असेही कालच स्पष्ट केले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या बैठकीस आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन विचारे, कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे मातोश्रीवर
आले होते.

धमक्यांचे फोन
आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत जाऊन शिवसेनेवर टीका केल्याने शिवसेनेमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. त्यांच्या नावाने बोटे मोडणा-या काही जणांनी आज परांजपे यांंच्या आई व भावाला फोन करून धमकावल्याचे समजते. याबाबत पोलिस वा स्वत: परांजपे यांनी काहीही सांगितले नसले तरीही ठाण्यातील राष्ट्रवादीतील एका आमदाराने ही माहिती ‘दिव्य मराठी’ ला दिली. परांजपे यांना हात लावण्याचा प्रयत्नही कुणी केल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील; मात्र अशा धमक्या देण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे कोणत्या थराला जाऊन राजकारण करीत आहेत, हेच स्पष्ट झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
सेना खासदार परांजपे राष्ट्रवादीत, शरद पवारांनी दिला युतीला धक्का
मी कोणाचेही घर फोडले नाही - अजित पवार
अजित महाराष्ट्रात तर सुप्रिया केंद्रात- वारसदाराबाबत शरद पवारांचे संकेत