आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या पवारांना पंचाहत्तरीच्या शुभेच्छा, कौतूक अन् चिमटेही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शरद पवार आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षात पर्दापण करीत आहेत. आम्ही त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करून त्यांचे मन:पूर्वक अभीष्टचिंतन करतो! महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडणारी जी व्यक्तिमत्त्वे आज उरली आहेत त्यात शरद पवारांचा उल्लेख करावा लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पवारांचे कौतूक केले आहे. मात्र कौतूक करतानाच उद्धव यांनी पवारांना चिमटेही काढले आहेत. राजकारण चोवीस तास त्यांच्या धमन्यांतच खेळत असते. मात्र पवार आता राजकीय निवृत्तीची भाषा करीत असतात, पण त्यावर कोणी विश्‍वास ठेवू नये. ते बुद्धिबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार याविषयी आमच्या मनात शंका नाही. निवृत्तीची भाषा हा चकवा आहे या शब्दांत पवारांची फिरकी घेतली आहे.
'सामना'त पवारांबाबत काय भाष्य करण्यात आले वाचा, एक एक मुद्दे...
- देशाच्या राजधानीत शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतनाचा जंगी सोहळा दोन दिवस आधीच झाला. मराठी नेत्याचा इतका जंगी सोहळा देशाच्या राजधानीत कधीच झाला नसेल. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी, मुलायम सिंग यादव, लालू यादव, पंजाबचे मुख्यमंत्री बादल, लालकृष्ण आडवाणी, फारुख अब्दुल्ला, नितीशकुमार, देशाचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्या-राज्याचे मुख्यमंत्री या सोहळ्यास पवारांच्या अभीष्टचिंतनासाठी हजर होते. पवारांनी त्यांच्या राजकीय जीवनात जे पेरले ते या सोहळ्यात उगवलेले दिसले.
- देशाच्या राजकारणात पन्नासेक वर्षे टिकून राहण्याचा चमत्कार शरद पवारांनी केला आहे व इतक्या वर्षांनंतरही सर्वच राजकीय पक्षांत त्यांचा पाठीराखा वर्ग मोठा आहे. त्याचेच प्रत्यंतर दिल्लीतील सोहळ्यात आले. राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी यांच्यासह अनेकांनी पवारांच्या राजकीय कर्तबगारीचे कौतुक केले.
- पंतप्रधान मोदी यांनी या सोहळ्यात सांगितले की, ‘‘शरद पवार हे राजकीय हवामानतज्ज्ञ आहेत. देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे समजून घ्यायचे असेल तर काही वेळ शरद पवारांसोबत बसले पाहिजे!’’ पवारांना हवामान कळते हे खरे असेलही, पण राजकारणातील अनेक वादळे व सुनामी त्यांनी स्वत:च निर्माण केल्या व त्या भोवर्‍यात अडकून त्यांचेच नुकसान झाले.
- राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी यांच्यासह अनेकांनी पवारांच्या राजकीय कर्तबगारीचे कौतुक केले आहे. हे कौतुक ज्यांनी ऐकले असेल त्यांच्या मनात प्रश्‍न निर्माण झाला असेल की, एकमेकांवर कौतुकाची फुले उधळणारे हे लोक मग एकमेकांविरुद्ध निवडणुका का लढवतात आणि एकमेकांविरुद्ध कारस्थाने का करतात?.
- योग्यता असूनही पवार पंतप्रधानपदी बसू शकले नाहीत. ‘देशाला न लाभलेला उत्तम पंतप्रधान’ (द बेस्ट पीएम इंडिया नेव्हर हॅड) असे राहुल बजाज यांनी पवारांविषयी म्हटले. त्यात तथ्य असले तरी याबाबत पवारांचे फासे चुकले की त्यांचे फासे त्यांच्यावरच उलटले? हा राजकीय संशोधनाचा विषय आहे.
- मोदी व सोनिया गांधी यांनी पवारांचे गुणगान केले. पवार यांच्यात उत्तुंग कर्तबगारी व गुण आहेतच, पण दीडेक वर्षांपूर्वी मोदी यांनी बारामतीत येऊन काका-पुतण्यापासून महाराष्ट्र मुक्त करण्याची हाक का दिली होती? व सोनिया गांधी यांनी तर 13 वर्षांपूर्वी पवारांना काँग्रेस पक्षातून फेकून दिले होते ते कशासाठी?
- शरद पवार यांनी महाराष्ट्रात व देशात 50 वर्षे राजकारण केले. त्यांनी 14 निवडणुका लढवल्या व ते अपराजित राहिले. शरद पवार यांच्या इतका प्रचंड क्षमतेचा नेता महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात झाला नाही. प्रशासनावर मांड ठोकून राज्य कसे चालवावे याचे धडे नवख्यांनी शरदरावांकडूनच घ्यावेत.
- बारामतीसारखा मागास परिसर विकासाच्या दृष्टीने देशाच्या नकाशावर नेऊन ठेवला. जगभरातील नेत्यांचे पाय बारामतीस नेहमीच लागतात, पण संपूर्ण महाराष्ट्रास बारामतीचे भाग्य लाभले नाही हे सुद्धा तितकेच खरे.
- शेतकर्‍यांच्या व शेतीच्या प्रश्‍नांबाबत पवारांचा अनुभव प्रचंड आहे, पण शेतकरी आत्महत्या करतोय हे सत्य नाकारता येत नाही. पवार आज राष्ट्रीय पातळीवरील बलदंड नेते आहेत व उद्योग, सामाजिक क्षेत्रातील पुढारी पवारांचा शब्द मानतात, पण महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जातोय हीदेखील वस्तुस्थिती आहे. खरे म्हणजे हे राज्य होते म्हणून शरद पवार जगाला माहीत झाले. त्यामुळे पवारांचा प्रचंड अनुभव राज्याच्या कामी यावा अशी भावना महाराष्ट्राने बाळगली तर काय चुकले?
- देशाचा सर्वोच्च नेता होण्याची क्षमता असूनही पवारांना ते भाग्य लाभले नाही, तरीही पवार राजकारणात 50 वर्षे तळपत राहिले. दिल्लीत त्यांच्या अमृत महोत्सवाचा सोहळा झाला. आज महाराष्ट्रात सर्वच लोक एकत्र येऊन ‘शरदोत्सव’ साजरा करीत आहेत.
- शरदरावांच्या बुद्धिमत्तेचा पल्ला केवळ राजकारणापुरताच मर्यादित नाही. ते एक साहित्यप्रेमी, कलाप्रेमी, नाट्यप्रेमी रसिक आहेत. ते उत्तम नकलाही करू शकतात. ते संभाषणचतुर आहेत. क्रीडा रसिक आहेत. जीवनाच्या सर्वच अंगांविषयी त्यांना रस आहे. शरद पवार आता राजकीय निवृत्तीची भाषा करीत असतात, पण त्यावर कोणी विश्‍वास ठेवू नये. ते बुद्धिबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार याविषयी आमच्या मनात शंका नाही. निवृत्तीची भाषा हा चकवा आहे. त्यामुळे शरदरावांकडून शिकण्यासारखे खूप आहे.
बातम्या आणखी आहेत...