आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याने ‘मातोश्री’ वर प्रचंड खळबळ उडाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना फोन करून नाराजी कळवली असून सूत्रांनुसार ‘महाराष्ट्रातील भाजपच्या उतावळ्या नेत्यांना आवरा, अन्यथा युती तोडलीच म्हणून समजा’, असा निर्वाणीचा इशारा उद्धव यांनी दिला.
शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी या नाराजीला दुजोरा देताना महायुतीत मनसेची गरज नसल्याचे सांगितले. त्याचा युतीवर परिणाम होऊ शकतो, असे सूचक विधानही त्यांनी केले. भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. महायुतीला चांगले वातावरण असताना ते बिघडवण्यात येत आहे आणि ते बरोबर नाही, असे राऊत म्हणाले.
फडणवीसांनी काढली समजूत!
गडकरींनी महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात न घेता परस्पर राज यांची भेट घेतल्याने उद्धव संतापले असल्याचे समजताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची फोनवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव काही केल्या ऐकायला तयार नसल्याने शेवटी सोमवारी मध्यरात्री फडणवीस यांना ‘मातोश्री’ गाठावे लागले. फडणवीसांनी उद्धव यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.
भाजपची मुंबई उत्तर मध्य, भिवंडी, पुणे, सोलापूर, नंदूरबार व लातूर या जागेवर उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा झाली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी भिवंडी व उस्मानाबादच्या जागेवर अदलाबदल करण्याविषयी शिवसेनेबरोबर चर्चा झाली असली तरी याविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे
गडकरी भेटीच्या दुस-या दिवशी मनसेच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात विविध पर्यायांवर चर्चा झाली. राज ठाकरे यांनी मात्र मौन बाळगणेच पसंत केले.
नितीन गडकरी
गतवेळी शेट्टी व आठवले सोबत नसल्यामुळे युतीला फटका बसला होता. आता तेच होऊ नये म्हणून मी राज यांना भेटलो. त्यात गैर काय? (सोमवारी भेटीनंतर)
उद्धव ठाकरे
महायुती योग्य मार्गाने जात असताना गडकरींना उतावळेपणास कोणी सांगितले? असेच करायचे असेल तर शिवसेनेचा मार्ग वेगळा असेल.
महायुतीत तणाव नाही : देवेंद्र फडणवीस
गडकरी-राज भेट काँगे्रसविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी झाली होती. याउपर या बैठकीत काहीएक निर्णय झालेला नाही. महायुतीत सर्वकाही सुरळीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. भाजपच्या दुस-या यादीतील उमेदवारांची नावे 8 मार्चला जाहीर होतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.