आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही सत्तेचे भुकेले नाही, मंत्रिमंडळ विस्ताराऐवजी मुंबईच्या लोकांची काळजी -ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशात सध्या सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची काळजी लागलेली असली तरी आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ध्येयावर गेली ५० वर्षे चालतोय.  आम्हाला मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून आम्ही आरोग्य शिबिरे भरवतोय, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्याशी संपर्क साधलेला नसून आम्हीही सत्तेचे भुकेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे २०१४ मध्ये अलिबाग येथील अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी १०० टक्के राजकारण करण्याची आवश्यकता बोलून दाखवली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे ध्येय बोलून दाखवले  आहे.  

नरेंद्र मोदी सरकारचा रविवारी सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजपसोबतच जदयूच्या काही खासदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी चर्चा आहे. शिवसेनेचे एक मंत्रिपद रिकामे असल्याने शिवसेनेलाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे म्हटले जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाजपशी संपर्क केलेला नसून त्यांनीही आमच्याशी संपर्क केलेला नाही, असे स्पष्ट केले. ठाकरे म्हणाले,  नाना पटोले यांचे विधान ऐकल्यानंतर भीतीच्या सावटाखाली मंत्रिमंडळात खरेच सहभागी व्हायचे का, या गोंधळात मी पडलो आहे.   

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत पाणी साचल्यानंतर पालिकेला जबाबदार धरले जाते, पण मुंबईत सुरू असलेली मेट्रोची कामे आणि रेल्वेसेवेची काहीच जबाबदारी नाही का? मुंबई आमची आहे, हे शहर आमचे घर आहे, ही भावना कायमच शिवसैनिकांमध्ये असते. गोरखपूरमध्ये ऑक्सिजनअभावी लहान मुलांचा मृत्यू झाला तेव्हा अशा घटना घडतच असतात, अशी वक्तव्ये झाली. परंतु आम्ही पूर येतच राहणार आणि माणसे मरतच राहणार असे म्हणण्याएवढे निर्दयी नाहीत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. 

धोकादायक इमारतीतील लोकांना घरे द्यावीत  
भेंडी बाजारमध्ये एवढ्या इमारती धोकादायक आहेत आणि एवढ्यांना आम्ही नोटिसा दिल्या हे सांगण्यापलीकडे सरकारच्या गृहनिर्माण धोरणाची मजल जात नाही. केवळ अमुकतमुक ठिकाणी जागा खाली झाल्यानंतर गरिबांना घरे देऊ, असे सांगितले जाते. निवडणुकीच्या प्रचारातही ‘पंतप्रधान आवास योजने’सारख्या लोकप्रिय घोषणा करून गरिबांना मोफत घरे देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, सरकारने अशा लोकप्रिय घोषणा देण्यापेक्षा धोकादायक इमारतीमधील नागरिकांची पर्यायी व्यवस्था करून आहे ती परिस्थिती सुधारावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...