आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Accept Advice Of Senior Leaders

उद्धवना आधार ‘हिंदुत्वा’चाच, रावते, कदम यांनी सुचवलेल्या आक्रमक भूमिकेतून भाजपवर दबाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेली पंधरा वर्षे सत्तेपासून दूर असल्याचे नैराश्य, शिवसेनाप्रमुखांच्या पश्चातही सत्तेची चालून अालेली संधी न दवडण्याची मानसिकता यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक निकालापासूनच राज्य व केंद्रातील सत्तेत सहभागाविषयी अनुकूल हाेते. त्यामुळेच भाजपकडून वेळाेवेळी काेंडी हाेत असल्याचे समजत असूनही सत्तेपुढे ‘शहाणपण’ चालत नव्हते. मात्र रविवारी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा समाेर अाणून उद्धव ठाकरे यांनी केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील माेदी सरकारसमाेरही अाव्हान उभे केले. पक्षातील जुन्याजाणत्या अाक्रमक नेत्यांच्या रणनीतीमुळेच इतकी कठाेर भूमिका घेण्यास उद्धव राजी झाल्याचे सांगितले जाते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा उचलायचे, परंतु त्यात शिवसेनेला शाेभेल असा कट्टरपणा दिसत नव्हता. निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी खासगीत का हाेईना पण भाजपला सत्तास्थापनेत सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली हाेती. त्यांनी भाजपकडे उपमुख्यमंत्रिपदासह १० मंत्रिपदांची मागणी केली होती. तसेच केंद्रातही मंत्रिपदांची मागणी केली होती. सत्तेतील भागीदारीची चर्चाही याच मुद्द्यावर फिरत हाेती. मात्र केंद्रासह राज्यात माेठे यश मिळाल्याच्या अभिमानात असलेला भाजप शिवसेनेला फारसे महत्त्व देत नव्हता. राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याने त्यांना शिवसेनेची तशी आवश्यकता वाटत नव्हती. मात्र शिवसेनेतील बहुतांश नेते व अामदार सत्तेत सहभागी हाेण्यासाठी उतावीळ असल्याने उद्धव यांच्याकडून मानहानी सहन करूनही भाजपशी जवळीक साधण्याचेच प्रयत्न केले जात हाेते. मात्र शिवसेनेला गृहीत धरण्याची भूमिका साेडण्यास भाजप तयार नसल्याने तसेच विनाअट पाठिंब्याचीच अट कायम ठेवल्याने अखेर उद्धव ठाकरेंना ताठर भूमिका घ्यावी लागली अाणि त्यासाठी ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्याचे अस्त्र त्यांनी बाहेर काढले. यातून भाजपवर दबाव टाकण्यात ते यशस्वी ठरल्याचे मानले जाते.

शरद पवार हवेत की हिंदुत्व?
शिवसेना नेते दिवाकर रावते आणि रामदास कदम हे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे कट्टर नेते म्हणून अाेळखले जातात. आपल्या भाषणात अनेकदा हे दाेघेही मुस्लिमांवर कठाेर शब्दांत टीका करतात. राज्यात एमआयएमला यश मिळाल्यानंतर रावते आणि कदम यांनी हिंदुत्व धोक्यात अाल्याची अावई उठवली हाेती. सत्तेत सहभागाबाबत बहुतांश नेते अनुकूल असताना रावते व कदम मात्र अपमानास्पद वागणूक देणा-या भाजपसाेबत न जाण्याच्या मागणीवर ठाम हाेते. मराठी अस्मितेपेक्षा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला बॅकफूटवर टाकता येईल, असाही त्यांचा दावा हाेता. त्यामुळेच अाजवर सर्व अस्त्रे निकामी ठरल्याने अखेर उद्धव यांनी हिंदुत्ववादी अस्त्राचा वापर रविवारी केला. शरद पवार हिंदुत्वविराेधी असल्याने त्यांचा पाठिंबा घेणार का, असा सवाल करत भाजपला चांगलेच काेंडीत पकडले. यातून भाजप व पंतप्रधान माेदींनी हिंदुत्ववादाबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे अाव्हान दिल्याचे सांगितले जाते.
मोदींकडून उद्धव ठाकरेंचा अपमान : अडसूळ

नवी दिल्ली | रविवारी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना फोन केला होता, परंतु मोदी फोनवर आले नाहीत. हा आमच्या पक्षप्रमुखांचा अपमान आहे. आम्ही राज्यात विरोधी बाकावर बसू, परंतु भाजपकडून होणारा अपमान सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली. शनिवारी दुपारी चार वाजता केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना मोदी यांना भेटण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता. राज्यातील सत्तेबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते भेटणार होते. परंतु प्रतीक्षा करूनही मोदी यांनी गिते यांना भेट देण्याचे टाळले. अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने गितेंना उद्धव ठाकरे यांनी मुंबईला परत बोलावले. रात्रभरात सर्व निवळेल असे वाटल्याने शिवसेनेने एक पाऊल मागे घेत रविवारी अनिल देसाई यांना दिल्लीला पाठविले. मात्र माेदींनी फाेन न घेतल्याने देसाई यांनाही परत बोलावल्याचे अडसूळ म्हणाले.
पुढे वाचा, रविवारी दिवसभर घडलेल्या घडामोडी...