आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray And Raj Thackeray Come Together On The Death Anniversary Of Balasaheb Thackeray

उद्धव भेटीचे राज, चर्चेस कारण; 15 मिनिटांच्या सहज संवादाने राजकीय भूकंप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकमेकांच्या शेजारी बसून हसतखेळत गप्पा मारत सोमवारी आपल्या ‘एकी’चे दर्शन घडवले. त्यामुळे मराठी मानस सुखावले आणि नव्या चर्चेलाही तोंड फुटले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोघांचेही श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे ते दोघेही बाळासाहेबांच्या दुसऱ्या स्मृतिदिनािनमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवाजी पार्कवर येणार हे नक्की होते. मात्र, त्यांनी अशा पद्धतीने ‘एकी’चे दर्शन घडवून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपच घडवून आणला आणि नव्या राजकीय समीकरणांचे संकेतही दिले.
दोन भावांची ही भेट कौटुंबिक असल्यामुळे त्यातून राजकीय अर्थ काढू नये, असे शिवसेनेकडून सांगितले जात असले तरी सध्या या दोघांचेही ‘बुरे दिन’ सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी ‘अच्छे दिन’वाल्यांना इशारा देण्यासाठी ही गळाभेट घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. राज यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सगळे घडवून आणले आणि या दोन भावांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनाप्रमुखांनाआदरांजली अर्पण केली. शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक मुंबईत बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्मारकासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात येईल. ही समिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करील. त्यानंतर स्मारकाचे काम सुरु केले जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक बांधण्यास शिवसेना आणि शिवसैनिक भक्कम आहेत. आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक आम्हीच बांधू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहाण्यासाठी रविवार रात्रीपासूनच शिवसैनिकांचे जत्थे शिवाजी पार्ककडे येत होते. संपूर्ण राज्यभरातून आलेले शिवसैनिक भगव्या टोप्या घालून शिवसेनाप्रमुखांना शांतपणे आदरांजली वाहात होते. परत या परत या बाळासाहेब परत या, बाळासाहेब अमर रहे अशा घोषणा देत साश्रू नयनांनी शिवसैिनक स्मृतीस्थळावर फुले वाहताना दिसत होते. महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि पूनम महाजन यांनीही शिवाजी पार्क येथे येऊन शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. सातच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सपत्नीक शिवाजी पार्क येथे आले आणि शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. रिपाइं नेते रामदास आठवले, महसूल मंत्री एकनाथ खडसे, पूनम महाजन यांनीही बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. या शिवाय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनीही तेथे दिवसभर गर्दी केली होती.
राजकारणात काहीही होऊ शकते. पण अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरेंचाच असेल.
-एकनाथ शिंदे, विरोधीपक्षनेते

दुपारी एकच्या सुमारास राज स्मृतिस्थळी आले. अनिल देसाई यांनी त्यांना स्मृतिस्थळी नेले. आदरांजली वाहून राज उद्धव यांच्याकडे गेले. रामदास कदमांनी राज यांना उद्धव यांच्या बाजूला बसवले आणि १५ मिनिटे उद्धव यांच्याशी मनमोकळा सहज संवाद साधला आणि राजकीय भूकंप घडला.

मुख्यमंत्र्यांना ‘चले जाव’ : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसह स्मृतिस्थळी आले. त्यांना पाहताच शिवसैनिकांनी ‘चले जाव, चले जाव’ आणि बाळासाहेब अंगार है, बाकी सब भंगार है अशा घोषणा देत भाजपबद्दलच्या रोषाला वाट मोकळी करून दिली.

मोदींच्या भाषणाच्या वेळचे साधले टायमिंग
राजयांना माध्यमे आणि त्यावरील कार्यक्रमांची पुरेपूर जाण आहे. सिडनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सव्वा एकच्या सुमारास भाषण सुरू होणार होते. हे भाषण सगळ्याच वाहिन्यांवर दाखवले जाणार हेही नक्की होते. निदान मराठी वाहिन्यांवर तरी मोदींच्या भाषणाला खीळ बसावी म्हणूनच राज टायमिंग साधून एकच्या सुमारास शिवतीर्थावर आले. राज-उद्धव भेटीला मराठी वाहिन्या प्राधान्याने दाखवतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती. झालेही तसेच. राज यांना पुणे दौऱ्यावर जायचे असल्याने ते दुपारी आल्याचे सांगितले जात असले तरी शिवाजी पार्कवरून परतल्यानंतर बराच काळ घरी होते.

"अच्छे दिन' वाल्यांवर दबावासाठी "बुरे दिन' वाल्यांची खेळी
शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधंूच्या भेटीने राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी

हेतू
राजयांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य हेरून शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेची भाजपसोबत तर नाशिकमध्ये मनसेची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता आहे.

मनसुबे
शिवसेना-मनसेजवळ आल्यास मुंबई, कल्याण- डोंबिवली आणि नाशिक महानगरपालिकांवर या दोघांचे निर्विवाद वर्चस्व होऊ शकते. त्यामुळे भाजपला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. मुंबई महानगरपालिका कब्जात घेण्याचा भाजपचा विचार आहे. त्या मनसुब्यांना सुरुंग लागू शकतो.

साध्य
राजठाकरे शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर जाणारच होते. त्यांनी काही जणांकडे याबाबतचे सूतोवाचही केले होते. पण तेथे त्यांनी उद्धवशी हस्तांदोलन, मनमोकळ्या गप्पा मारून ‘एकी’चे दर्शन घडवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेषत: भाजपच्या गोटात त्यामुळे चलबिचल सुरू झाली.

अर्थ
राजयांनी उद्धव ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी एकूणच स्मृतिस्थळाच्या सजावटीबाबत चर्चा केली. संजय राऊतही या चर्चेत त्यामुळेच सहभागी झाले होते. पण या चर्चेचे राजकीय अर्थ काढण्यास सुरुवात झाली आहे.