आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray And Raj Thackeray Come Together On The Death Anniversary Of Balasaheb Thackeray

बाळासाहेबांचा स्मृतिदिन: राज ठाकरेंचे स्वागत, तर देवेंद्रांना ‘चले जाव’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: बाळासाहेबांची उणीव शिवसैनिकांना जाणवतेच. त्यामुळेच दुसऱ्या स्मृतिदिनीही ‘परत या’चा आग्रह सुरू होता.)

मुंबई- मनसे की भाजप.. शिवसेनेने भविष्यात कोणाबरोबर मैत्री करावी याचा स्पष्ट निर्वाळा बाळासाहेबांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी सोमवारी शिवसैनिकांनी दिला. शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट दिलेल्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले, त्यावरून शिवसैनिकांच्या मनात भाजपपेक्षा मनसेविषयीचे ममत्व असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे शिवसैनिकांच्या लेखी विचारधारेपेक्षा रक्ताच्या नात्यालाच महत्त्व असल्याचा प्रत्यय आला.

'राज्यात शिवसेनेला बळकटी आणण्यासाठी राज व उद्धव यांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या शिवसैनिकांनी या भावांमधील दुरावा कमी होत असल्याचे स्वागत केले, तर सत्तेत सहभागासाठी शिवसेनेला झुलवत ठेवणाऱ्या भाजप नेत्यांवर मात्र रोष व्यक्त केला.'
विरोधी पक्षात बसूनही भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याबाबत अजूनही एकीकडे शिवसेना नेतृत्व आशावादी असताना शिवसैनिकांनी भाजपबरोबरच्या मैत्रीला पूर्णविराम देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोमवारी बाळासाहेबांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आलेल्या इतर मंत्री आणि भाजप नेत्यांना पाहताच शिवसैनिकांच्या रागाचा पारा चढला. शिवसैनिक आक्रमक होतील या शंकेने ग्रासलेल्या भाजप नेत्यांनी एकटेदुकटे येण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांसह येणे पसंत केले होते. अखेर भाजप नेत्यांची भीती खरी ठरली. शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच "मुख्यमंत्री चले जाव'च्या घोषणा दिल्या. शिवसैनिकांच्या निषेधाच्या घोषणा ऐकल्यानंतरही शिवसेना नेत्यांपैकी कुणीही त्यांना शांत करण्यासाठी पुढे येण्यास धजावले नाही. या प्रसंगानंतर तरी शिवसेना नेतृत्वाने आता भाजपचा नाद सोडून द्यावा, अशी प्रतिक्रिया उपस्थित असलेल्या बहुतांश शिवसैनिकांनी व्यक्त केली.

एकीकडे भाजपबाबत ही परिस्थिती असताना स्मृतिस्थळी बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मात्र शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. दुपारी एकच्या सुमारास राज स्मृतिस्थळाला वंदन करण्यासाठी येताच भूतकाळातली कटुता विसरून शिवसैनिकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात राज यांचे स्वागत केले. राज यांच्या येण्याने शिवसेना नेत्यांमध्येही उत्साह दिसत होता. साधारण २० मिनिटे राज स्मृतिस्थळापाशी बसून उद्धव ठाकरेंशी गप्पा मारत होते. दोन्ही भाऊ एकत्र आले तर भाजपला चांगलाच धडा शिकवू, अशी प्रतिक्रियाही काही शिवसैनिकांनी या वेळी व्यक्त केली. शिवसैनिकांच्या या भावना पाहता शेवटी समान विचारधारेच्या भाजपपेक्षा प्रसंगी राजकीय विरोधात असलेल्या रक्ताच्या नात्यालाच शिवसैनिकांनी झुकते माप दिल्याचे दिसून येत होते.

स्मारकाला विरोध करणारे राज ठाकरे आता ‘लाडके’
खरे तर या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला राज ठाकरेंच्या मनसेने सुरुवातीला विरोध केला होता. स्मृतिस्थळासाठीच्या जागेवरून शिवसेना आणि राज्य सरकार असा वाद सुरू असताना राज यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच एखाद्या छोट्याशा उद्यानरूपी स्मारकापेक्षा बाळासाहेबांसारख्या दिग्गज नेत्याचे स्मारक एखाद्या सेवाभावी संस्थेच्या रूपाने असावे, अशी भावनाही राज यांनी व्यक्त केली होती. शिवाय बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवून राज यांनी मुंबईबाहेर जाणे पसंत केले होते. मात्र, तरीही आज राज यांच्या येण्याने शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही आदरांजली