आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Attacks Once Again On Bjp Over Spilt Of Allience & Modi Wave

लाट आहे तर मग मोदींच्या 25 सभा हव्यात कशाला? उद्धव यांचा भाजपला सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही जर मोदी लाट आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 सभांची गरज भाजपला का भासत आहे, असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांची हवा काढून टाकली आहे. 25 वर्षाची युती तोडण्याचे पाप भाजप नेत्यांचेच आहे, असेही उद्धव यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव म्हणाले, मला अनेक लोक येऊन आशीर्वाद देत आहेत. याआधी असे घडले नव्हते. समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय हे मी शुभसंकेत मानत मानतो. यावेळी काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला.
उद्धव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, आम्ही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. घटकपक्षांना विचारात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. मोदींना पाठिंबा देताना शिवसेनेसह सर्वांनीच मोठी मेहनत घेतली आहे. सहजासहजी अशी एनडीएचा पाठिंबा काढणे योग्य ठरणार नाही. मोदी हे चांगले व्यक्ती व पंतप्रधान आहेत. त्यांच्याबाबत माझी काहीही तक्रार नाहीये. मोदींशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ. राज ठाकरेंची भेट घेतली का असे पत्रकारांनी विचारले असता, राज माझा भाऊ आहे तो आजारी असल्याने त्याला फोन केला होता. पण माझ्या भावाला फोन केला किंवा भेटलो तर इतरांची तब्बेत बिघडायचे काय कारण आहे अशी खोचक टिप्पणी उद्धव यांनी केली.
युती तोडण्याचे पाप भाजप नेत्यांचेच असल्याचे सांगत उद्धव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. उद्धव म्हणाले, युती कोणी तोडली हे खरे तर मला कोणीही विचारू नये. ते भाजप नेत्यांनाच विचारावे. याचबरोबर इतर राज्यांत कोणी व कशी युती तोडली ते पाहा मग तुम्ही काय काढायचे ते निष्कर्ष काढा असेही उद्धव यांनी सांगितले. येत्या शुक्रवारी दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होईल. तेथे सालाबादप्रमाणे शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येईल. मात्र सभा होणार नाही. यंदा दसरा मेळाव्याची जाहीर सभा बोरिवलीत (जेथून भाजपचे विनोद तावडे उभे आहेत त्या मतदारसंघात) होणार असल्याचे उद्धव यांनी जाहीर केले. पुढील वर्षापासून नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कावरच दसरा मेळावा व सभा होईल असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा व विधानसभा निवडणुका या पूर्णपणे वेगळ्या असल्याचा पुर्नच्चार उद्धव यांनी करीत मोदी लाट नसल्याचे पुन्हा ठासून सांगितले. उद्धव म्हणाले, मोदी लाट लोकसभेला होती हे आम्ही कधीही नाकारले नाही पण आता ती राहिली नाही हे आम्ही वारंवार सांगत आहोत. जर मोदी लाट आहे तर भाजपला मोदींच्या विधानसभा निवडणुकीसाठी 25 सभा कशासाठी घ्यावा लागत आहेत. याआधी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात कोणत्या पंतप्रधानाने एवढ्या सभा घेतल्या होत्या ते मला सांगा असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला.