आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- स्वत:चे काहीही अस्तित्व नसलेले मुखवट्यांमागून राजकारण करत आहेत. अगोदर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून लोक जमवले आणि आता नरेंद्र मोदी यांचा मुखवटा लावून मते मागत असलेले महाराष्ट्राची वाट लावावयास निघाले असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली.
महायुतीच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार पूनम महाजन यांनी शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसेने दुसर्या यादीतही शिवसेनेला लक्ष्य केल्याबाबत विचारता, उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावून लोकांना गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेबांनी ताकीद दिल्यावर त्यांनी ते बंद केले. स्वत:च्या चेहर्याने मते मिळणार नाहीत हे माहीत असल्यानेच मोदींचा मुखवटा लावून मते मागितली जात आहेत, अशी टीका राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेना महाराष्ट्र व देशाचे सुयश चिंतित असल्याने पूर्ण ताकदीने महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुका लढवत आहोत. माझी वृत्ती सकारात्मक असून आम्हाला कोणाचेही वाईट करायचे नाही. परंतु या वेळी स्थिर सरकार येणे महत्त्वाचे असून ते आले नाही तर देश संपून जाईल, असेही ठाकरे म्हणाले.
राणे शिवसेनेचा प्रचार करतील ?
नारायण राणे यांनी एका मुलाखतीत शिवसेनेत मी चालेन का, असा प्रश्न केला होता. त्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, टीव्हीवर बोलल्याचे मी ऐकले आहे. या प्रकरणातले खरे-खोटेपण तपासावे लागेल. आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना जर का बोलायचे असेल तर ते बोलू शकतात. मात्र तोपर्यंत जर का त्यांना शिवसेनेबद्दल प्रेम असेल, ते चालतील म्हणण्यापेक्षा, राणे शिवसेनेचा निवडणुकीत प्रचार करणार का हे त्यांना विचारा. सिंधुदुर्गमधून शिवसेनेच्या विनायक राऊत यांना निवडून आणणार का? पूर्वीसारखे शिवसेनेसाठी फिरणार का? आज निवडणुकीचे वातावरण आहे, शांत वेळी याबाबत बोलता येईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
नार्वेकरांबाबत योग्य वेळी बोलू
राहुल नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, ज्यांनी बातम्या दिल्या त्यांनीच खुलासा करावा. शिवसेनेची भूमिका योग्य वेळी जाहीर केली जाईल. त्यामुळे या विषयावर आताच बोलणे उचित ठरणार नाही. पूनम महाजन यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाकरे-महाजन कुटुंबीयांचे जुने संबंध असून पूनम आमच्या घरची असून ती खासदार होईल, असा मला विश्वास आहे.
गजानन बाबरांबाबत ते म्हणाले, उमेदवारी न देण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेण्यात आला होता. बाबर यांना नगरसेवक, आमदार, खासदार केले तेव्हा त्यांना ते फुकटात मिळाले. मात्र, आता उमेदवारी विकल्याची टीका ते करत आहेत. स्वत:ला मिळाले नाही की विकले जाते असे कधीही म्हटले जाते. त्यांचे गैरसमज लवकर दूर होवोत, असेही ठाकरे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
ठाण्यात पानसेंना मनसेचे तिकीट
9 मार्च रोजी मुंबईत झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिवसेनेतून मनसेत दाखल झालेल्या अभिजित पानसे यांना ठाण्यातून शनिवारी लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर भिवंडीतून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना मनसेने रिंगणात उतरवले आहे. ठाण्यात शिवसेनेने राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून येथे संजीव नाईक आणि आपचे संजीव साने निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ठाण्यात चौरंगी लढत होईल. युवा सेनेचे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांच्याकडे गेल्याने अभिजित पानसे नाराज होते. त्यामुळे ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा शिवसेनेत होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.