आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मातोश्री’,‘वर्षा’वर खेटे: मुंढेंना हटविण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काम करण्यास सांगितल्याने सर्वपक्षीय नगरसेवक अस्वस्थ अाहेत.

मुंढे यांना पदावरुन हटवावे यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात अाहे. त्यासाठी या नगरसेवकांनी शुक्रवारी ‘मातोश्री’ व ‘वर्षा’ बंगल्यावर धाव घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी चर्चा करुन गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशी बाेलण्याचे अाश्वासन दिले. तर मुख्यमंत्र्यांनी मात्र नगरसेवकांना भेट दिली नसल्याचे वृत्त अाहे.

अायुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा अाराेप हाेता. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव अाणण्यात अाला. भाजप नगरसेवकांनी मात्र या अविश्वास प्रस्तावाला विरोध केला होता. दरम्यान, बहुमताने हा अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही मुख्यमंत्री मात्र मुंढेंवर कारवाई करण्याच्या तयारीत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे मुंढे अजूनही अायुक्तपदावर कार्यरत अाहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या मुंढेंविराेधी नगरसेवकांनी शुक्रवारी अाधी ‘माताेश्री’वर धाव घेतली. मुंढेंना तातडीने पदावरुन पायउतार करावे, अशी मागणी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली. या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, नवी मुंबईचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, महापौर सुधाकर साेनावणे (राष्ट्रवादी), काँग्रेसचे गटनेते, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष अादी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी जेव्हा मोठ्या संख्येने एकत्र येऊन निर्णय घेतात तेव्हा त्याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. अधिकार आहेत म्हणून कुणालाही पायउतार करणे हा त्यामागे हेतू नाही. नवी मुंबईत जनतेला आयुक्तांकडून त्रास दिला जातोय त्याविरोधात ही नगरसेवकांची एकजूट आहे. हे लोकप्रतिनिधी अनुभवी आहेत. जनतेच्या भावना लक्षात घेऊन ते काम करतात,’ असेही त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री मुंढे यांची पाठराखण करीत अाहेत काय? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी तसे म्हटलेले नाही. गरज भासल्यास मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलेन. पक्षभेद बाजूला ठेवून सर्वच लोकप्रतिनिधी जनतेच्या हितासाठी अविश्वास ठरावासाठी एकत्र आले होते. काही मर्यादा असतील म्हणून भाजप नगरसेवकांनी पाठिंबा दिला नसावा. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, नगरसेवक जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या एकजुटीमागे नक्कीच काही तरी गंभीर कारण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांशी चर्चा करावी. सरकार जनतेच्या भावनेचा अनादर करेल असे वाटत नाही,’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

...नाहीतर नगरसेवकांचा अधिकारच काढून घ्या
लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करा, नाहीतर नगरसेवकांकडील अविश्वास ठरावाचा अधिकार काढून घ्या अाणि मुख्यमंत्री म्हणतील तसाच कारभार चालवा. पण कायद्यात तशी तरतूद असेल तर त्या तरतुदीनुसार सरकारने निर्णय घेतलाच पाहिजे.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
बातम्या आणखी आहेत...