आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Congtars Arvind Kejriwal, Warning To Bjp

शिवसेनेचे \'आप\' प्रेम : उद्धव ठाकरेंच्या अरविंद केजरीवालांना फोनवरून शुभेच्छा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीत आम आदमी पक्षाने जबरदस्त यश खेचून आणल्याने सगळ्याच्या कौतुकाचा विषय ठरलेल्या अरविंद केजरीवाल यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनीही केजरीवालांचे अभिनंदन केले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपला हा इशारा दिल्याचे मानले जात आहे.
आपल्याला माहित असेलच की भाजपचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली विधानसभेत शिवसेनेचे 18 उमेदवार उभे केले होते. आता केजरीवालांनी निकालाच्या रूपाने भाजपला सपाटून मार दिल्यानंतर उद्धव यांनी केजरीवालांना फोन करून शुभेच्छा दिल्याने शिवसेनेची आगामी दिशा स्पष्ट करणारी आहे. ही घटना शिवसेना- भाजपात सर्व काही ठीक नसल्याचे स्पष्ट करणारी आहे. कारण केंद्रात व राज्यात भाजपसोबत शिवसेना सत्तेत आहे. मात्र, भाजप व खासकरून शहा-मोदींची जोडी शिवसेनेला अपमानास्पद वागणूक देत असल्याने उद्धव हे भाजपवर कमालीचे नाराज आहेत. मात्र, सध्या मोदींचा काळ असल्याने उद्धव यांनी थोडी नमती भूमिका घेत मिळेल त्या सत्तेवर, पदावर समाधान मानत असल्याचे दिसत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपला अडचणीत आणू शकणा-या अशा 18 जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपवर काही कडव्या हिंदुत्त्ववादी संघटना नाराज होत्या. त्यांनीही शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेला दिल्लीत आपला एकही उमेदवार जिंकणार नाही याची कल्पना होती. तरीही भाजपची जिरवण्यासाठी उद्धव यांनी उमेदवार उभे करण्यास परवानगी दिली होती. तसेच 18 उमेदवार देत दुस-या फळीतील नेत्यांना प्रचाराच्या कामाला लावले होते. यात खासदार चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, अनिल देसाई यासारख्या वरिष्ठ नेत्यांना समावेश होता.
शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असताना भाजपने सेनेला केवळ 1 मंत्रिपद दिले आहे. ते खातेही अवजड उद्योगसारखे दुय्यम असल्याने उद्धव यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, याची ना मोदींनी दखल घेतली ना भाजपने. त्यानंतर भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवत ऐनवेळी 25 वर्षाची युती तोडली. भाजपने मित्रपक्षांना सोबत घेत 122 जागा जिंकल्या व राज्यातील सत्ता शिवसेनेशिवाय मिळवली. त्यानंतर सेनेला केवळ 5 दुय्यम कॅबिनेट खाती दिली आहेत. त्यामुळे उद्धव यांच्यासह शिवसेनेचे नेते व शिवसैनिक भाजपवर नाराज आहेत. उद्धव यांनी आज केजरीवाल यांचे फोन करून अभिनंदन करीत भाजपला स्पष्ट शब्दांत जो काही द्यायचा आहे तो संदेश दिला आहे.