आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Criticises State Government Over Lbt

सर्वच प्रश्न कोर्ट सोडवणार, तर सरकारचे काय काम? उद्धव ठाकरे यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची सोडवणूक न्यायालयाच्या माध्यमातून होत आहे. सर्वच प्रश्न जर न्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघत असतील, तर राज्य सरकार काय कामाचे?’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपस्थित केला.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आलेल्या भारत डायमंड बोर्सच्या डायमंड ट्रेडिंग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई महापालिका क्षेत्रात लागू होणार्‍या ‘एलबीटी’बाबत ते म्हणाले, नव्या करप्रणालीबाबत सरकारने गोंधळ घातला आहे. त्यामुळे व्यापारी नाराज आहेत. त्यांच्याशी चर्चा न करताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीचा निर्णय एकतर्फीच घेतला आहे. याबाबत निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेलाही मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतले नाही. त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे.

राज्याच्या, देशाच्या वैभवात भर टाकणार्‍या व्यापार्‍यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहील, असे आश्वासनही उद्धव यांनी व्यापार्‍यांना दिले. आगामी निवडणुकीत जनतेने महाराष्ट्राची सत्ता आम्हाला दिली तर मनपाप्रमाणेच राज्याचा कारभारही उत्तमरीत्या चालवून दाखवू, असेही ठाकरे म्हणाले.