आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीतील 70 मुलांचा मृत्यू हे सामुदायिक बालहत्याकांड; शिवसेनेचा \'सामना\'तून योगींवर प्रहार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उत्तर प्रदेशामधील गोरखपूरच्या इस्पितळातील 70 मुलांचा मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे, अशा शब्दात दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशातील बालमृत्यूवरून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करण्यात आली आहे.
 
काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात
ऑगस्ट महिन्यात येथे मुले मरतातच असे सांगणाऱ्यांना आमचा एक सवाल आहे. मग हा पटकीचा फेरा फक्त गरीबांच्या घरातच का शिरतो? ऑगस्टमध्ये मंत्र्यांच्या व दबंगांच्या घरात हा पटकीचा फेरा का शिरत नाही?, असा सवाल यावेळी करण्यात आला आहे.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिल्यापासून हुकमत असलेला गोरखपूर जिल्हा आहे. त्या गोरखपुरात बालकांच्या मृत्यूचे हे तांडव म्हणजे माणुसकीला आणि शासनाला कलंक आहे. इस्पितळातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला व 70 मुलांना प्राण गमवावे लागले. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीची बिले वेळेत भरली गेली नाहीत. सरकारने बिले थकवली व ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला. हे असे घडले असेल तर उत्तर प्रदेशात 70 बालकांचे सामुदायिक हत्याकांड घडले आहे व या हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
 
पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 14-15 लाखांची ‘माया’ जमा झाली असती तर या माता-पित्यांना चांगले उपचार मुलांना देता आले असते व औषध, ऑक्सिजनशिवाय पोरांचे तडफडून होणारे मृत्यू पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. गरीबांचे दुःख आणि वेदना राज्यकर्त्यांचे मन अस्वस्थ करीत नाही हेच आमच्या स्वातंत्र्याचे अपयश आहे. ही वेदनाच गरीबांची ‘मन की बात’ आहे, पण ती समजून घेण्याऐवजी त्या वेदनेची खिल्ली उडवली जाते, असा टोलाही त्यांनी योगी सरकारला लगावला आहे.
बातम्या आणखी आहेत...