Home »Maharashtra »Mumbai» Uddhav Thackeray Criticizes Narendra Modi On GST

‘गुजरात में फटी तो GST घटी’, शिवसेनेकडून भाजपवर जीएसटीप्रकरणी झुकल्याची टीका

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 14:43 PM IST

  • ‘गुजरात में फटी तो GST घटी’, शिवसेनेकडून भाजपवर जीएसटीप्रकरणी झुकल्याची टीका

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. नुकताच 28 टक्क्यांचा सर्वांत उच्च जीएसटी दर असलेल्या 177 वस्तू काढून त्या 18 टक्के जीएसटी गटात समावेश करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या याच निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’तून टीका केली आहे. पैशांचा पाऊस पाडूनही गुजरात विधानसभा निवडणुकीत मतांची रोपटी उगवणार नाहीत या भयानेच जीएसटीप्रकरणी सरकार झुकल्याची टीका त्यांनी केली आहे.

गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करत ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जीएसटीला सामान्य लोकांचा पाठिंबा असून दलाल व करबुडवे व्यापारीच जीएसटीविरोधात आकांडतांडव करत आहे असे म्हणाऱ्यांनी आता ‘यू टर्न’ घेतला असून लोकक्षोभापुढे सरकार झुकल्याचे त्यांनी म्हटले. कोणत्या विषयात राजकीय लाभ व प्रसिद्धी मिळवण्यास भाजपचे आघाडीवर असल्याची टीका त्यांनी केली.

काय म्हटलंय…

– आपणच कौटिल्याचे बाप असून देशाचे व गरिबांचे अर्थशास्त्र फक्त आम्हालाच समजते अशा तोऱ्यात असलेल्यांचे गर्वहरण अखेर जनतेनेच केले आहे.

ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना गावबंदी केली आहे. त्यांच्या पत्रकार परिषदा होऊ दिल्या जात नाहीत. त्यांची पोस्टर्स चौकातून उतरवली जात आहेत. स्वतः अमित शहा यांना प्रचारासाठी रस्त्यावर उतरावे लागले व पंतप्रधान मोदी हे तर 50-50 सभा घेऊन भाजपचा प्रचार करणार आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच राज्याराज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री हे त्यांची कामेधामे सोडून व देश-राज्य वाऱ्यावर टाकून गुजरात निवडणुकीतील प्रचारासाठी तंबू ठोकून बसणार आहेत. पैसाही तुफान फेकला जाईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

अर्थात जीएसटीमधून घेतलेली माघार हा निवडणूकपूर्व भ्रष्टाचार असून छोटय़ा व्यापाऱ्यांच्या मिशीला तूप लावण्याचाच प्रकार आहे. ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ असे जे आता गमतीने बोलले जात आहे त्यात चुकीचे काहीच नाही. जीएसटीच्या विरोधात बोलणारे कालपर्यंत देशाचे व अर्थव्यवस्थेचे मारेकरी ठरले होते. मग या देशाच्या मारेकऱ्यांचे ऐकून सरकार का झुकले याचा खुलासा व्हायला हवा. जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली व नोटाबंदीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली हे सत्य मनमोहन सिंग यांच्यासारखे सरळमार्गी व सचोटीचे अर्थतज्ञ सांगत आहेत, पण ‘‘मनमोहन सिंग कोण?’’ या गुर्मीत बोलणाऱ्यांना गुजरातच्या सामान्य जनतेने जमिनीवर आणले आहे. जीएसटीमुळे महागाई वाढली आहे व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. तरीही जे लोक बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा उदो उदो करीत आहेत तेच खरे तर देशाचे दुश्मन असून त्यांच्यावर आर्थिक हेराफेरीचे व देशाला खड्डय़ात घालण्याचे उद्योग केल्याबद्दल खटले दाखल करायला हवेत असे उद्धव ठाकरे बोलले आहेत.

छोटा व्यापारी हा जगण्यास पात्र नाही काय? हा देश जितका अंबानी-अदानीचा आहे तितकाच तो छोटय़ा व्यापाऱ्यांचा आहे. त्यामुळे सगळय़ांना जगवणाऱ्या व चुलीतील आग कायम ठेवणाऱ्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आम्ही करतो. नोटाबंदीमुळे उद्योगात मंदी येऊन लाखो लोकांचे रोजगार बंद झाले असतील तर आम्ही त्या नोटाबंदीच्या विरोधात उभे आहोत. जीएसटी ही नवी समान करप्रणाली देशाला मजबूत अर्थव्यवस्था खरोखरच देत असेल तर त्यास विरोध करण्याचा नतद्रष्टपणा आम्ही करणार नाही, पण हीच जीएसटी मुंबईसारख्या शहरांना केंद्राचे आर्थिक गुलाम बनवणार आहे. म्हणून आम्ही मुंबईच्या स्वाभिमानासाठी उभे ठाकलो असे अग्रलेखात म्हटले आहे.

Next Article

Recommended