आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अहमदाबादही तुंबले, आता तिथल्या नालेसफाईची चौकशी करणार काय?\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काही तासांत 500 मिलीमीटर पावसाने मुंबईला तडाखा दिल्यानंतर मुंबई तुंबली म्हणून बोंबाबोंब करून नालेसफाईच्या चौकशीची मागणी करता... मग आता अहमदाबादही तुंबले, तिथले नाले भरले.. त्याचे काय करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. मुंबईतील नालेसफाई व्यवस्थित सुरू आहे. त्याच्या चौकशीची मागणी करणा-यांना मी महत्त्व देत नाही, असा टोलाही उद्धव यांनी आशिष शेलार यांना हाणला.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी मुंबईत 500 मिमी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला होता. यावेळी मुंबईत पाणी तुंबले होते. यावर विरोधकांनी ही मुंबई नव्हे तर तुंबापुरी असल्याची टीका केली होती. मात्र, विरोधी पक्षाचे हे कामच असते असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या टीकेकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, त्यानंतर जेव्हा शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या व मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने नालेसफाईवर आक्षेप घेत ती व्यवस्थित झाली नाही. कंत्राटदारांनी फक्त बिले काढून घेतली अशी टीका केली होती.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोडलेल्या टीकेचे बाणाने शिवसेना घायाळ झाली होती. मात्र, आठवड्याभरातच मुंबईला जसा पावसाचा तडाखा बसला होता तसाच अहमदाबादसह गुजरातमधील काही शहरांना बसला आहे. गुजरातमध्ये 250 मिलीमीटर पाऊस पडला असतानाही ठिकठिकाणी पाणी तुंबले, नद्यांना पूर आला, रेल्वे ठप्प झाली, घरे कोसळली, रस्ते नष्ट झाले, तसेच या पावसाने तब्बल 70 जणांचे बळी गेले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली. शेकडो शहरांचा संपर्क तुटला. मुंबईपेक्षा अर्ध्याने कोसळलेल्या पावसाने गुजरातची अक्षरश: दुर्दशा केली आहे.
पावसाच्या तडाख्याने अर्धे गुजरात पाण्याखाली गेले. अमरेली आणि बगसरा जिल्ह्यांत सलग सहा तास कोसळलेल्या पावसाने अमरेली येथील शेत्रुंजी नदीवरील पूल वाहून गेला. अनेक ठिकाणी रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. रेल्वे ठप्प झाली. अमरेली, राजकोट, भावनगर, सोमनाथ येथील घरे बुडाली. एकट्या राजकोटमध्ये साडेपाच हजारांहून अधिक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
गीर आणि धारी जिल्ह्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला. जून वाघडिया येथे पाणी तुंबल्याने घर कोसळून एकाच कुटुंबातील 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमरेलीत 23 जणांचे वाहून जाणारे मृतदेह सापडले. गुजरात रोडवेजची बस नाल्यात कोसळून पाच प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला. विजेच्या धक्क्याने दोनजण मरण पावले.
पावसाने गुजरातची दाणादाण उडवली असताना शिवसेनेने भाजपला यावरून फैलावरून घेतले. नेमका हाच मौका साधून उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. गेल्या आठवड्यात शुक्रवारी 500 मिमी पावसाचा जबरदस्त तडाखा सोसूनही काही तास पाणी तुंबलेली मुंबई अवघ्या एका दिवसात रुळावर आली असतानाच दुसरीकडे दोन दिवसांत झालेल्या 250 मिमी पावसाने गुजरातला मात्र बुडवून टाकले. मुंबई तुंबली म्हणून बोंबाबोंब करून नालेसफाईच्या चौकशीची मागणी करता... मग आता अहमदाबादही तुंबले, तिथले नाले भरले.. त्याचे काय करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. मुंबईतील नालेसफाई व्यवस्थित सुरू आहे. त्याच्या चौकशीची मागणी करणा-यांना मी महत्त्व देत नाही, असा टोलाही उद्धव यांनी आशिष शेलार यांना हाणला.
बातम्या आणखी आहेत...