आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Declare They Give To Money Of People

फोटो विक्रीतून मिळणारा पैसा शेतकरी कुटुंबीयांना - उद्धव ठाकरे यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या राजकीय धावपळीतून वेळात वेळ काढून फोटोग्राफीचा छंद जोपासतात. गेल्या काही वर्षांत काढलेल्या फोटोग्राफ्सचे एक प्रदर्शन बुधवारपासून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू होत आहे. या प्रदर्शनात काही फोटोग्राफ्स विकले जाणार असून त्यातून मिळणारे पैसे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देणार असल्याची माहिती ठाकरे यांनी सोमवारी दिली. यासाठी ट्रस्टही स्थापन केला जाणार आहे.

फोटोग्राफी प्रदर्शनाबद्दल माहिती देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले, कॅनडातील हाडे गोठवणारे उणे ४० ते ६० सेल्सियसचे तापमान आणि त्या थंडीत राहणाऱ्या ध्रुवीय अस्वलांचे फोटोग्राफ्स, जगभरात प्राचीन हिंदू मंदिरांचा देश म्हणून ख्याती असलेल्या कंबोडियातील वृक्षांच्या आड लपलेली व कोरीव काम असलेली देवळे, इन्फ्रारेड फोटोग्राफीच्या नव्या तंत्राने काढलेली छायाचित्रे ही माझ्या या वेळच्या फोटोग्राफी प्रदर्शनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. यासोबत काही मोठ्या कलाकारांचे पोर्टेटही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचे हे तिसरे फोटोग्राफी प्रदर्शन असून यापूर्वी त्यांनी गडकिल्ले, पंढरपूरची वारी, हवाई छायाचित्रण करून काढलेल्या फोटोग्राफ्सचे प्रदर्शन भरवलेले होते. १९९५ मध्ये भरवलेल्या प्रदर्शनातून त्यांनी ४० लाख रुपये जमा केले होते.

दुष्काळग्रस्तांना राज्य सरकार जी मदत करीत आहे ती कमीच आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातूनही काही मोठी रक्कम जमा होईल असे नाही, परंतु एक-दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जरी मदत झाली तरी माझा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हणता येईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते उद‌्घाटन
सात जानेवारी रोजी जहांगीर आर्ट गॅलरीत उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद््घाटन होणार आहे. एकूण ७० फोटोग्राफ्स या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून स्वतः उद्धव ठाकरे प्रदर्शन काळात दुपारी १२ ते सायंकाळी सहापर्यंत जहांगीर आर्ट गॅलरीत उपस्थित राहून पाहुण्यांचे स्वागत करणार आहेत. पोर्टेट वगळता अन्य छायाचित्रे विकण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यातून किती पैसे जमा होतील असे विचारता, उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पैसे किती गोळा होतील ते सांगता येणार नाही, परंतु चांगली रक्कम जमा होईल आणि ती शेतकऱ्यांसाठी असेल,’ असा दावा त्यांनी केला.