आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Has Given Remote Of Power To Me CM

युती सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्याच हाती, फडणवीस यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा ‘रिमोट कंट्रोल’ उद्धव ठाकरेंच्या स्वाधीन केला असला तरी उद्धव ठाकरेंनी सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ माझ्याकडे दिला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आता उद्धव ठाकरेंनी तो रिमोट कंट्रोल माझ्या हाती दिला आहे, हे इतर मंत्र्यांनी (शिवसेनेच्या) समजून घेतले पाहिजे, असा अप्रत्यक्ष इशाराच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर सातत्याने टीका करणाऱ्या काही शिवसेना मंत्र्यांना देऊन टाकला. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्यामुळे भाजप व शिवसेना युती सरकार म्हणून सत्तेत असली तरी भाजप सेनेला फारशी किंमत देण्यास तयार नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले.बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या योजनांच्या लोकार्पण सोहळ्याचे निमित्त साधून फडणवीसांनी हा इशारा दिला. या वेळी एसटीच्या शिवशाही या वातानुकूलित बससेवेचा प्रारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायली तसेच आमदारांची कामे वेगाने होत नसल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखवली आहे. सत्तेत एकत्र असूनही दोन दिशांना तोंड असल्याची भाजप-सेनेची तऱ्हा असल्याने फडणवीस व उद्धव ठाकरे या कार्यक्रमात काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कार्यक्रमात शेवटी बोलण्याची संधी साधत फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वांना माझेच ऐकावे लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराही दिला. युती सरकार चालवण्याची जबाबदारी भाजपप्रमाणे शिवसेनेचीही आहे. हे सरकार पाच वर्षे चालेल की नाही, अशी शंका काहीजण व्यक्त करत आहेत, पण उद्धव ठाकरेंच्या सहकार्याने हे सरकार पाच वर्षे नक्की चालेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. एकाच कार्यक्रमात मित्रपक्षाला इशाराही द्यायचा आणि त्यांच्यावर विश्वासही टाकायचा, असा दुहेरी खेळ करत फडणीसांनी एसटीचा फड जिंकला.
सरकार बदलल्याची चुणूक : उद्धव
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना शाबासकी देत उद्धव ठाकरे म्हणाले की, परिवहन विभागाची कामातील चुणूक पाहता सरकार बदले असल्याचे नागरिकांच्या लक्षात येत आहे. लोकांनी याचसाठी शिवशाहीची प्रतीक्षा केली होती.