आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेवर प्रथमच माफी मागण्याची वेळ; राजकीय हानी टाळण्यासाठीच उद्धव यांचा माफीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दै. सामनामध्ये गेल्या रविवारी छापून आलेल्या व्यंगचित्रावरून उठलेल्या वादळाने शिवसेनेची हानी होण्याची शक्यता दिसत होती. तसेच व्यंगचित्रामुळे शिवसेनेतील मराठा नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. स्वबळावर सत्ता आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही नाराजी महाग पडेल, असे वाटू लागल्यानेच त्यांनी पाच दिवसांनंतर माफी मागून प्रकरण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांनी माफी मागून प्रकरण मिटवण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यांनी माफी मागण्यास नकार दिल्यानेच उद्धव ठाकरे यांना पुढे यावे लागले.
शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सार्वजनिक रूपाने माफी मागण्याची वेळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आली. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा विवादित वक्तव्ये केली; परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने त्यांनी कधीही माफी मागितली नाही. मात्र, सामनात आलेल्या व्यंगचित्रामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमागे शिवसेनेला फरपटत जावे लागले होते. शिवसेनेतील काही नेते सत्तेत जावे या मताचे होते, तर काही विरोधात. मात्र, सत्ता महत्त्वाची असल्याने उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सत्तेत सहभागी होऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो, हे त्यांना जाणवले होते. पुढील निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेनेमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर असून विदर्भ-मराठवाड्यात शिवसेनेची ताकद ही मराठेच आहेत. शिवराय आणि भगवा या दोन गोष्टींमुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे वळला आहे. याच मराठा समाजाची मने व्यंगचित्रांनी दुखावली. दुखावलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. काही मराठा नेत्यांनी राजकीय गणिते लक्षात ठेवून राजीनामा देत असल्याच्या बातम्या दिल्या. हे सर्व प्रकरण फारच गंभीर असल्याचे अखेर उद्धव यांना जाणवले आणि त्यांनी माफी मागण्याचा निर्णय घेतला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी माफी मागण्याऐवजी संजय राऊत यांनी कार्यकारी संपादक म्हणून माफी मागावी, असा सूर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी धरला होता, तर दुसरीकडे काही वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी माफी मागून प्रकरण शांत करावे, असे सुचवले होते.
शिवसैनिक भावनिक असतात. त्यांच्या भावनेला हात घातला तर ते मागील सर्व विसरतात आणि जोमाने काम करतात, असे उद्धव ठाकरे यांना पटवून सांगण्यात आले. पुढील वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तसेच आता लवकरच ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आहेत. जर मराठा समाजाला शांत केले नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होऊ शकतो, असेही उद्धव यांना सांगण्यात आले. पत्रकार परिषदेपूर्वी दिवाकर रावते, सुभाष देसाई, अरविंद सावंत यांच्यासोबत ठाकरे यांनी बैठक घेतली आणि चर्चा केली. त्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी माफी मागण्याचे ठरवले आणि माफी मागितली. मात्र, माफी मागतानाच उद्धव ठाकरे यांनी अन्य पक्षाच्या मराठा नेत्यांना उघडे करण्यासाठी विशेष अधिवेशनाचे कार्डही खेळले आहे.
राजकीय गणितांमुळेच माफी
उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्यानंतर संभाजी ब्रिगेडने लगेचच प्रकरण संपुष्टात आल्याचे घोषित करून शिवसेनेवरील नाराजी दूर झाल्याचे घोषित केले आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी माफी मागणे किती उपयुक्त ठरले हे दिसून आले आहे. एकूणच शिवसेनेच्या इतिहासात एका व्यंगचित्रामुळे माफी मागण्याची नामुष्की केवळ राजकीय गणितांमुळेच उद्धव यांच्यावर आली. त्यांनी माफी मागितली आणि प्रकरणही संपुष्टात आले, हेच या माफीमागचे खरे राजकारण.