आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीची सत्ता येण्याची शक्यता असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी यांच्या नावाची पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा करण्यात आली होती. याचा लाभ भाजपला झाला. केंद्रात पक्षाची एकहाती सत्ता आली. निवडणुकीपूर्वी उमेदवारी जाहीर झाली तर त्याचा लाभ होतो हे या निवडणुकीत दिसून आले. महाराष्ट्रात भाजपच्या एखाद्या नेत्याची उमेदवारीसाठी घोषणा करावी, अशी पक्षात सद्यस्थिती नाही. अशा वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीची माळ पडू शकते.
दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही राज्यातील भाजपचे दिग्गज नेते आहेत. परंतु, भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर गडकरी केंद्रीय राजकारणात स्थिरावले. तेव्हापासून त्यांचा राज्याच्या राजकारणातील सहभाग जवळपास संपुष्टात आला. तसेही गडकरी यांचा विदर्भ वगळता महाराष्ट्राच्या इतर प्रांतांवर प्रभाव नाही. दुसरीकडे, गोपीनाथ मुंडे तळागाळातील लोकांचे नेते होते. महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मुंबईवर मुंडेंचा प्रभाव होता. परंतु, त्यांच्या निधनाने भाजपने मुख्यमंत्रीपदाचा जोरकस उमेदवार गमावला आहे. आता भाजपचा चेहरा होता येईल, असा या पक्षात कोणताही प्रभावी नेता नाही.
मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीचा विचार केला तर देवेंद्र फडणविस किंवा विनोद तावडे अगदी अलिकडचे नेते ठरतात. निवडणूक झाली आणि महायुतीला बहुमत मिळाले तरी दोघांच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होण्याची शक्यता कमीच आहे. महायुतीचा विचार केला तर कोणत्याही पक्षात मुख्यमंत्री होऊ शकेल, असा नेता नाही. अशा वेळी निवडणुकीनंतर उद्धव यांच्या नावाची घोषणा करण्याऐवजी त्यापूर्वीच महायुतीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोतर्ब होण्याची दाट शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीची माळ का पडू शकते, पुढील स्लाईडवर जाणून घ्या इतर कारणे....