आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभक्त मुसलमानांविरोधात आमचे हिंदुत्व नाहीच : उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शिवसेनेचे हिंदुत्व देशभक्त मुसलमानांच्या विरोधात नाही,’ असे वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे उपाध्यक्ष हाजी अराफत शेख यांना मंगळवारी शिवसेनेत प्रवेश दिला. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत असलेल्या हाजी अराफत शेख यांनी नुकताच राज ठाकरेंच्या नेतृत्वावर आरोप करत पक्ष सोडला होता. शिवसेनेने आता त्यांच्यावर वाहतूक सेनेची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी शेख यांच्या असंख्य समर्थकांनीही शिवबंधन बांधले.

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही नेहमी कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आलो परंतु आम्ही देशभक्त मुस्लिमांच्या विरोधात कधीही नव्हतो. मुसलमान समाजाचा गैरसमज झाला होता परंतु आता तो हळू हळू दूर होत आहे. शेख यांचा पक्षासाठी योग्य वापर केला जाईल. त्यांनी शिवसेनेत राहाण्याचे वचन दिले आहे, असेही ते म्हणाले.

अराफत शेख यांनी सांगितले, ‘मला आज माझ्या घरात आल्यासारखे वाटत आहे. माझी सुरुवात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातूनच झाली. राज ठाकरेंसोबत मी होतो. त्यामुळे त्यांनी मनसे काढल्यानंतर त्यांच्यासोबत गेलो कारण त्यांचे वागणे, बोलणे, चालणे बाळासाहेबांसारखे होते.

मराठी माणसासाठी राज्यासाठी ते काहीतरी करतील असे वाटत होते. परंतु १३ आमदार आल्यानंतर त्यांनी इंजिनाची दिशा फक्त ‘मातोश्री’कडे केली. मला आता त्याबाबत जास्त काहीही बोलायचे नाही. आता मी शिवबंधन हाती बांधले असून विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी काम करणार आहे, असे निर्धार त्यांनी केला.

नारायण राणे यांना त्रास देऊ नका
नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री होण्याची कुवत नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना उद्धव म्हणाले की, ‘राणेंबद्दल काही बोलू नका, त्यांना त्रास देऊ नका. वारंवार विचारून राणेंना किती त्रास द्याल?’ असा टोला ठाकरेंनी लगावला.
(फोटो : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपाध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला)