आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - सत्ताबदलाची चिन्हे आहेत. आपण सत्ता मिळवली नाही, तर इतिहासात आपली कपाळकरंटे म्हणून नोंद होईल, तेव्हा काँग्रेसच्या फोडाफोडीच्या राजकारणापासून सावध राहा आणि आघाडी सरकारला कायमचे गाडून टाका, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.
महायुतीच्या गोरेगावातील महाशिबिरात ते बोलत होते. या वेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, स्वाभिमानीचे राजू शेट्टी व रासपचे महादेव जानकर उपस्थित होते. सरकारच्या विरोधात आपण एकत्र लढतो, एकत्र तुरुंगात जातो, पण निवडणुकीच्या वेळेस मात्र काँग्रेस आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपण पाच पक्ष म्हणजे पांडव किंवा पंचमहाभूते आघाडी सरकारला गाडून टाकू, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला.
1995 मध्ये हिंदुत्वामुळेच सत्ता आली होती व आताही त्यामुळेच येणार आहे. हिंदू जागा झाल्याचे पाहून काँग्रेसने जातीपातीचे राजकारण सुरू केले असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
पक्षाचा नव्हे, उमेदवार महायुतीचा : मुंडे
सर्व विधानसभा क्षेत्रांत महायुतीची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगून भाजप नेते गोपीनाथ मुंडे म्हणाले, महायुतीचा कोणताही उमेदवार हा पक्षाचा नव्हे, तर महायुतीचा असेल. त्यामुळे पक्षभेद करू नका. 15 वर्षांत काहीही न करणारे सरकार आता तीन दिवसांत जोरात काम करत आहे. खोटे बोलून सत्तेवर आलेले कुंभकर्णी यूपीए सरकार आता जाता-जाता खोट्या भूलथापा देत आहे, असा घणाघाती हल्ला मुंडे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.