आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्सव साजरे करायचे की नाहीत? उद्धव ठाकरे यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केवळ दहीहंडीच नव्हे तर हिंदूंच्या सर्व सणांवर आतंकवादाचे सावट असल्याचे सांगितले जाते. गणेशोत्सव, नवरात्रीत दहशतवादाचे सावट, दिवाळीत फटाके फोडायचे नाहीत. आपल्याच देशात आपलेच सण साजरे करायचे नाही, जे काही साजरे करायचे ते सांभाळून आणि तेसुद्धा अतिरक्यांपासून सावध राहून. आपल्या अमरनाथ यात्रेवरही अतिरेक्यांचे हल्ले होतात. त्यामुळे आम्ही आमचे उत्सव साजरे करायचे की नाहीत, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मारहाण केलेल्या संदीप सावंत यांनी शनिवारी सेना भवन येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी दहीहंडीबाबत न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना ठाकरे म्हणाले, काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्ल्यू आला होता तेव्हा दहीहंडी साजरी करू नये, असे मी म्हटले होते आणि सगळ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अशा घटनांच्या वेळी आम्ही सहकार्य करतो. मात्र, प्रत्येक गोष्टीवर बंधने घालण्यात आली तर बंधनाच्या चौकटीत उत्सव कसे साजरे करणार? उत्सव हा उत्सवासारखा साजरा झाला पाहिजे. दहीहंडीत लहान मुलांचा वापर करण्यास विरोध असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.

आशिष शेलार यांनी सुरू केलेल्या अटलबंधनवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, या विषयावर मला काहीही बोलायचे नाही. शिवबंधन एका भावनेतून आले आहे. या बंधनामागे आमची भावना, निश्चय आहे नुसते मार्केटिंग नाही.
बातम्या आणखी आहेत...