आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Maharashtra Karnataka Dispute

कानडी दहशतवाद हाफीज सईदपेक्षाही भयंकर; महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नही महत्त्वाचाच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत कर्नाटक संघ व कर्नाटक भवनाच्या इमारती उभ्या केलेल्या चालतात मग आमच्या बेळगावात ‘महाराष्ट्र राज्याचा’ लावलेला बोर्ड तोडला जातो हा मस्तवालपणा आहे. कानड्यांची हॉटेल्स, उद्योग-व्यवसाय मुबंईत आहेत व त्यांच्या केसालाही कधी धक्का लागलेला नाही, पण बेळगावसह सीमाबांधवांना रोज पोलिसी बुटाखाली तुडवले जाते. हा हाफीज सईदइतकाच भयंकर दहशतवाद आहे.

कानडी पोलिस जर सीमाभागातील मराठी बांधवांवर ‘हाफीज सईद’ व कसाबसारखाच दहशतवाद करीत असतील तर त्याला लगाम घालण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. भारत-पाक सीमा प्रश्‍नाइतकाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील विद्यमान राज्यकर्ते हे नामर्द व शेळपट निघाल्यामुळेच आम्ही केंद्राकडे विनम्र होऊन न्याय मागत
आहोत. दिल्लीश्‍वरांनो, देताय ना न्याय?, अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारला यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमावादात बेळगावकर गेली 60 वर्षे अन्याय सहन करीत आले आहेत. मागील दोन दिवसापासून येळ्ळूर गावातील महाराष्ट्र राज्याचा जुना फलक कर्नाटक पोलिसांनी मोठ्या फौजफाट्याच्या बळजबरीने तोडून टाकला आहे. याबाबत मराठी लोकांत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेने 'सामना'त अग्रलेख लिहून याप्रश्नी मोदींना यात लक्ष घालण्याची
विनंती केली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, बेळगावातील ‘महाराष्ट्र’ खुणा नष्ट करण्यासाठी कानडींनी 24 तासात दोनदा दंगा केला. हाच फलक गावकर्‍यांनी पुन्हा लावला. तेव्हा भल्या पहाटे कानडी पोलीस गुंडांच्या आवेशात गावात घुसले व घरावर दगडफेक केली. महिलांना चोप दिला. तरुणांची डोकी फोडली. घरांची दारे-खिडक्या तोडल्या. ‘मराठी’ कुटुंबांचा ‘रोजा’ नसला तरी त्यांच्या नशिबी हे कानडी अत्याचार रोजचेच आहेत, पण एकतरी मायका लाल याप्रश्‍नी आवाज उठवतोय काय? ‘हे सारे दुर्भाग्यपूर्ण असून कानडी सरकारने हा दहशतवाद त्वरित थांबवावा’, असा दम कोणी भरतोय काय? महाराष्ट्र राज्य नावाने एक चौथरा अनेक वर्षांपासून आहे, पण ‘महाराष्ट्र’ व ‘मराठी’ नावाची पोटदुखी असलेल्या कर्नाटक सरकारने जनतेच्या विरोधास न जुमानता कानडी हातोड्यांनी हा फलक व चौथरा उद्ध्वस्त केला. बेळगावात मराठी अस्मितेची पुसटशी खूण ठेवायलाही तेथील मस्तवाल सरकार तयार नाही, पण याच न्यायाने मुंबई-महाराष्ट्रातील ‘मर्द’ जनतेने वागायचे ठरवले तर काय होईल याचा विचार कर्नाटकात अरेरावी करणार्‍यांनी करावा, असा इशाराही अग्रलेखातून कानडीं सरकार व जनतेला दिला आहे.

आतापर्यंतच्या केंद्रातील व राज्यातील सरकारवर टीका करताना अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, जगाला न्याय देण्याची भाषा करणारे या देशातील नेते व राज्यकर्ते इतक्या वर्षांनंतरही मराठी सीमाबांधवांना न्याय देऊ शकले नाहीत. उलट ‘महाराष्ट्रात जायचेच आहे’ या भूमिकेवर बेळगाव महापालिकेपासून विधानसभेपर्यंत सगळ्या निवडणुका मराठी माणसाने जिंकल्या. पण लोकभावनेचा इतका प्रचंड उद्रेक होऊनही दखल घेणार नसाल तर चुलीत घाला तुमची ती लोकशाही. बेळगाव महानगरपालिका बरखास्त करूनही पुन्हा त्या महानगरपालिकेवर
मराठी विजयाचा भगवा फडकलाच ना? पण त्याच पालिकेवरील भगवा ध्वज उतरवला गेला. शिवरायांचा भगवा उतरवणारे पापी हात एक दिवस झडून गेल्याशिवाय राहणार नाहीत व ज्या पापी हातांनी येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्याचा फलक उखडला त्या हातांनाही क्षमा नाही.

भारत-पाक सीमा प्रश्‍नाइतकाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍न शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे व आम्ही आमच्या बांधवांना वार्‍यावर सोडणार नाही. दिल्लीत आज नरेंद्र मोदी यांचे न्यायप्रिय व नि:पक्षपाती सरकार आले आहे. अशा कणखर नेतृत्वाकडून आता अत्याचारग्रस्त सीमा बांधवांना आशा उरल्या आहेत असे म्हणत दिल्लीश्‍वरांनो, देताय ना न्याय? अशी साद शिवसेनेने मोदी सरकारला घातली आहे.