आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पीड ब्रेकरचा बंदोबस्त करा; गडकरींबाबत उद्धव ठाकरे यांची भाजपला सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘राज्यात-केंद्रात सत्ता येणार हे ज्यांना नको आहे, त्यांचा त्यांच्याच पक्षनेतृत्वाने बंदोबस्त करावा,’ या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी नितीन गडकरींच्या ‘राज’भेटीचा समाचार घेतला. महायुतीला तडा गेलेला नाही आणि जाणारही नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. त्याचवेळी ‘शिवसेनेला कल्याण-डोंबिवलीत मनसे कशी चालते? राष्ट्रपतिपदासाठी तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देता, मग गडकरी-राज भेट का चालत नाही?’ असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीला तडा गेलेला नाही, मात्र काही जण मध्येच बिब्बा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे स्पीड ब्रेकर ज्यांचे आहेत त्यांनीच त्यांचा बंदोबस्त करावा. महायुती अभेद्य असून हातात हात घालून आम्ही पुढे जात आहोत. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. महायुतीत अन्य पक्षांचा पाठिंबा घेण्याचे मनात नसल्याचे भाजपने स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर ओढलेल्या आसुडाबाबत बोलताना उद्धव म्हणाले, इतर राज्यात काय चालले आहे ते अग्रलेखात मांडण्यात आले आहे. हा अनुभव मित्रपक्षांना येऊ नये म्हणून आम्ही भूमिका मांडली.

गारपीटग्रस्त भागातील दौर्‍यांचा तमाशा बंद करा : ‘गारपीटग्रस्त भागात दौर्‍यांचा तमाशा बंद करा,’ असे सांगत उद्धव ठाकरे यांनी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब मदत करा. यात आचारसंहिता आड येत असेल तर निवडणूक आयोगाला विनंती आहे की, त्यांनी यात स्वत: लक्ष घालून मार्ग काढावा’ असेही सांगितले. केंद्रीय पथक पाहणी करून मदत करणार असेल तर मंत्री आणि नेते दौरे का काढतात? असा प्रश्न करीत दौर्‍यांची थेरे थांबवून प्रत्यक्ष मदत वाटप करा, असा सल्लाही त्यांनी नेत्यांना दिला.

एकानेच बोलावे
उद्धव म्हणाले की, भाजपबाबत बोलण्यासारखे खूप काही आहे. परंतु आम्ही बोलत नाही. आमच्याकडूनही अनेक जण बोलू शकतात परंतु पक्षशिस्त म्हणून ते बोलत नाहीत. भाजपकडूनही एकानेच बोलावे, असेही त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले.