आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Nitin Gadkari, Divya Marathi

भाजपचे निर्णय मुंडेच घेतात,उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘महायुतीत नवा भिडू घेण्याचा विषय केव्हाच संपला आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये सर्व निर्णय गोपीनाथ मुंडेच घेतात. माझी त्यांच्याशी व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच आपण नितीन गडकरी यांच्याशीही बोलणार आहोत,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि गडकरी यांच्यात झालेल्या भेटीमुळे शिवसेनेत भाजपबद्दल नाराजी असून उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याची धमकी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, महायुतीत चांगले वातावरण आहे. कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हायला नको अशी आमची इच्छा आहे. नव्या पक्षाला जोडण्याचा विषय आमच्यासाठी संपलाय. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. मात्र, हे रण आम्हीच जिंकू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.


संभ्रम नको म्हणून गडकरींवर टीका
‘सामना‘तून नितीन गडकरी यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात महायुती भक्कम आहे. महायुतीसाठी चांगले वातावरण झाले असताना उगाच संभ्रम नको म्हणून ही टीका करण्यात आली आहे. गडकरींनी राज ठाकरे यांना केलेल्या आवाहनाबाबत माझ्याशी कसलीही चर्चा केलेली नाही. मात्र, मी लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


निवडणूक कोणीही लढवू शकतो
उर्वरित जागांच्या घोषणेबाबत उद्धव म्हणाले, महायुतीच्या फक्त तीन जागांची घोषणा राहिली आहे. ती आज किंवा उद्या करू. मनसे निवडणूक लढवणार नाही असे म्हटले जात आहे, यावर ते म्हणाले की, निवडणूक अपक्षही लढवू शकतात, कोणालाही निवडणूक लढवण्यावर बंदी आणू शकत नाही, ज्याला निवडणूक लढवायची आहे तो लढवू शकतो, असे म्हणत आपल्या लेखी असलेली मनसेची किंमतच त्यांनी दाखवून दिली.