आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Divya Marathi

हिंदूराष्ट्राला उध्‍दव ठाकरेंचा पाठिंबा, तर आठवलेंचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या ‘हिंदुस्थान हे हिंदू राष्‍ट्र’ या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र भागवत यांच्या मताचे समर्थन करून हा विचार शिवसेनाप्रमुखांनीच मांडल्याचे ठासून सांगितले.

दरम्यान, हिंदुस्थान हे एकमेव हिंदू राष्ट्र असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यालाही उद्धव यांनी सहमती दर्शवली.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करणा-यांची संख्या वाढत आहे कारण प्रत्येकाला शिवसेना आपला पक्ष वाटतो. आमच्या पक्षात येणा-या प्रत्येकाचा राज्याच्या विकासासाठी वापर करून घेतला जाईल.
सरसंघचालकांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, मोहन भागवत काहीही चुकीचे बोलले नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही नेहमी हिंदुस्तान हे हिंदू राष्‍ट्र असल्याचे सांगत असत. त्यांच्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबरोबर होणारी द्विपक्षीय चर्चा रद्द केल्याच्या निर्णयाचे स्वागत करताना उद्धव म्हणाले, पाकिस्तानशी गोडीगुलाबीने वागून काहीही होणार नाही. फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देणा-या पाकिस्तानशी कठोरतेनेच वागायला पाहिजे.

नियोजन आयोग रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेलाही उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या निर्णयामुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल असे म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी नियोजन आयोगाने आतापर्यंत काय केले ते सांगावे? असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

संघाचा विचार कदापि मान्य नाही
‘भारत हिंदुराष्‍ट्र हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत संघ परिवाराचे असून राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांना हा विचार मान्य नाही’, असे स्पष्ट करत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी महायुतीला घरचा आहेर दिला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
‘विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइंने महायुतीतील 20 जागांवर दावा केला असून, लोकसभेप्रमाणे कमी जागांवर आमची बोळवण या वेळी मान्य करणार नाही,’ असा इशाराही आठवलेंनी दिला.

मेळाव्यात पदाधिका-यांनी ‘आठवलेंना मंत्रीपद मिळावे’ अशी मागणी केली. शेवटी वैतागून मंत्रिपदासाठी हा मेळावा नसल्याचे आठवलेंना जाहीर करावे लागले. गोपीनाथ मुंडेंच्या निधनाने महायुतीचे मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.