आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Divyaa Marathi

गुजरातींवरील टीकेमुळे उद्धव ठाकरेंची अडचण, अग्रलेखामुळे संतप्त प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात गुरुवारी गुजराती समाजावर टीका करण्यात आल्याने हा समाज नाराज झाला आहे. पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी हा अग्रलेख लिहिला होता. भविष्यात त्याचा राजकीय फटका बसण्याच्या भीतीने सावध झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांची भूमिका पक्षाची नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत यांनी अग्रलेखात ‘बेपारी’ समाजाला चांगलेच ठोकून काढले होते. त्यामुळे गुजराती समाज संतापला. यंदाच्या निवडणुकीत हा समाज मोठ्या संख्येने भाजप-शिवसेना युतीच्या पाठीशी उभा राहिला होता. त्यांच्यावरच ‘सामना’तून टीका झाल्याने भाजप नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली.
मुखपत्रातील अग्रलेखातून शिवसेनेचीच भूमिका मांडली जाते, असा आजवरचा अनुभव आहे. यापूर्वी नितीन गडकरी, नरेंद्र मोदी यांच्यावरही अग्रलेखातून टीका करण्यात आली होती. शिवसेनेच्या या भूमिकेबाबत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणत्याही अग्रलेखाबाबत आम्ही प्रतिक्रिया देत नाही. मात्र अशी भाषा योग्य नाही. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार असून संपूर्ण जनता त्यांना पाठिंबा देत आहे. असे असताना दोन समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाहीच. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनीही अग्रलेखाचा परिणाम लक्षात घेऊन ताबडतोब पक्षाची ती अधिकृत भूमिका नसल्याचे सांगितले.

एकजूट कायम राहील : उद्धव
या अग्रलेखाबाबत उद्धव ठाकरे यांनाही कल्पना नव्हती. ते सध्या युरोपमध्ये सुटी घालवत आहेत. मात्र गुजराती समाज नाराज झाल्याची बातमी कळताच त्यांनी तेथूनच तातडीने प्रसिद्ध पत्रक काढले. ‘देशात खंबीर सरकार यावे म्हणून महाराष्ट्रात सर्वांनी यंदा एकजुटीने मतदान केले आहे. मराठी आणि गुजराती बांधवांची ही एकजूट पाहून अनेकांच्या पोटात मुरडा आला आहे. हे दोन समाज एकत्र आल्याने आपले काय होणार या भीतीने काही रिकामटेकडे या संबंधांत बिब्बा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र गुजराती-मराठी समाजाची एकजूट तुटणार नाही,’ असेही या पत्रकात उद्धव यांनी म्हटले आहे.

बिब्बा घालणारे कोण?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकात बिब्बा घालणा-या रिकामटेकड्यांचा उल्लेख केला आहे तो पक्षप्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याबाबत असल्याचे शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. एकूणच संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना तोंडघशी पडण्याची वेळ आली. मुखपत्रातील भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे सांगितले जात असतानाही आता मात्र ती पक्षाची भूमिका नसल्याचे सांगून शिवसेना नेतेही हात झटकत आहेत. दरम्यान, भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेचे स्वागत केले आहे.