आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Nationalist Congress

राष्ट्रवादी काँग्रेस विकाऊ अन् गद्दारांचा पक्ष,उद्धव ठाकरेंची पवारांवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी हा विकाऊ आणि गद्दारांचा पक्ष आहे. शरद पवार यांचा कुठे काय मिळते यावरच डोळा असतो, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. गुजरातमध्ये दंगली झाल्या, पण तुमच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात झालेल्या गोवारी हत्याकांडाबाबत का बोलत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.


महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथे शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. चांगल्या आणि वाईट काळात शिवसेना-भाजप एकत्र राहिले. त्यामुळे महायुती अभेद्य आहे. महायुतीसाठी सध्या चांगले वातावरण असल्याने ठाणे व कल्याणमध्ये सेनेचेच खासदार हवेत, असे ठाकरे म्हणाले.


राष्ट्रवादी हा गद्दारांचा पक्ष आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मी सर्वप्रथम उघड पाठिंबा दिला होता. काही जणांची राष्ट्रवादीसोबत छुपी युती असून केवळ पाडापाडीचे काम केले जात आहे, या शब्दांत मनसेवर टीका करीत ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार असल्याचेही त्यांनी म्हटले. जे मर्द आहेत त्यांच्या हातावरच शिवबंधन टिकते, जे नामर्द आहेत त्यांना शिवबंधन पेलत नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देणा-यांवर केली.


गोध्राचे काय?
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही हिंदुत्वावर बोललो तर कारवाई करतात, मग ओवेसीवर कारवाई का करीत नाही? इशरत जहाँ निर्दोष तर प्रज्ञा सिंगचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेस हा आत्मविश्वास नसलेला पक्ष आहे. आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला, पण काँग्रेस अजूनही उमेदवार जाहीर करू शकलेली नाही. काँग्रेस नेहमी गुजरात दंगलीचा उल्लेख करते, परंतु आधी काँग्रेसने गोध्राचे उत्तर द्यावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.