आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Raj Thackeray, Divya Marathi

आम्ही आघाडी धार्जिणे नाहीच,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आम्ही जे काही करतो ते खुलेपणाने. अप्रत्यक्षपणे इतर कोणालाही (कॉँग्रेस- राष्‍ट्रवादी आघाडीला) मदत करण्याचा प्रयत्न करीत नाही,’ या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. मनसेमुळे महायुतीच्या मतांवर परिणाम होईल का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले. नितीन गडकरी यांच्याशी कसलाही वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


छोट्या पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका गाजवणारे प्रख्यात मराठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेला भाजप नेत्यांना दोन प्रश्न विचारले होते. त्या दोन प्रश्नांची उत्तरे मिळाली का? या प्रश्नावर उद्धव म्हणाले की, भाजप नेत्यांनी फोनवरून माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. त्याने माझे समाधान झालेले आहे. त्यांनी काय उत्तरे दिली ती मी तुम्हाला आता सांगणार नाही, कारण भाजपच त्या प्रश्नांची उत्तरे घोषित करणार आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये कधीही वाद नव्हता मात्र अकारण काही जण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळेच मी ‘स्पीडब्रेकरना आवरा’ असे म्हटले होते. मात्र गडकरींविरोधात अपक्ष उमेदवार देण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही.


गोपीनाथ मुंडे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती याकडे लक्ष वेधताच उद्धव ठाकरे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी राज ठाकरे यांची भेट कधी, कुठे घेतली ते तुम्हाला माहिती होते का? हा प्रकार नंतर कळला. मात्र गडकरी जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांच्यापैकीच एकाने माध्यमांना कळवले. मग ही गुप्त भेट कशी म्हणायची? असा प्रतिप्रश्न उद्धव यांनी केला.


शरद पवार, प्रफुल पटेल यांच्यापाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांनीही गुजरात दंगलीप्रकरणी मोदींना क्लीन चिट दिली आहे. यावरून भाजप राष्ट्रवादीच्या जवळ येत आहे असे वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उद्धव म्हणाले, राष्ट्रवादी नेहमी सत्ताधा-यांकडे जाण्याचा प्रयत्न करते. अजित पवार म्हणतात की, त्यांनी काही गोष्टी घोषित केल्या तर माझी झोप उडेल. माझी झोप खरेच उडाली आहे कारण आम्हाला सत्तेत यायचे आहे. मात्र निवडणुकीनंतर अजित पवार यांची झोप नक्कीच उडेल.


राष्‍ट्रवादीकडे उमेदवारच नाहीत
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना राष्ट्रवादी, मनसे तिकीट देत आहे. त्याचा शिवसेनेवर कितपत परिणाम होईल? असे विचारता उद्धव म्हणाले, त्यांच्याकडे उमेदवार नाही. म्हणूनच आमच्याकडून गेलेल्यांना तिकीट देत आहेत. मात्र केवळ पदांसाठी ज्यांनी पक्ष सोडला ते शिवसैनिक नव्हतेच. मोदींबरोबर प्रचार करणार का? असे विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांचा कार्यक्रम अजून आमच्याकडे आलेला नाही. आम्ही एकत्रच प्रचार करू परंतु सगळीकडेच आम्ही सगळे एकत्र असू असेही नाही, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.


मिलिंद नार्वेकरची पाठराखण
‘शिवसेना सोडून जाणारे सगळेच मिलिंद नार्वेकरवर का आरोप करतात ते मला ठाऊक नाही. याबाबत आरोप करणा-यांनाच विचारा,’ असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आपले स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. ‘मिलिंद नार्वेकर चांगले काम करीत नाहीत असे वाटते तर तुम्ही त्यांची जागा घ्या,’ असा टोलाही त्यांनी पत्रकारांना लगावला.


राहुल नार्वेकर घरजावई
‘विधान परिषदेची उमेदवारी मागे घेण्याबाबत तुम्हाला सांगितले होते, असे राहुल नार्वेकर सांगत आहेत,’ या प्रश्नावर उद्धव म्हणाले की, मी त्याला आदल्या दिवशी बोलावले होते परंतु तो आला नाही आणि एका दिवसात लगेच त्याला राष्‍ट्रवादीने उमेदवारी दिली. हे एका दिवसात घडले असेल का? आधी तो राष्‍ट्रवादीच्या नेत्याचा जावई होता तो आता घरजावई झाला ही नीलम गो-हे यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे.’