मुंबई - ‘काही जणांना आपण मुख्यमंत्री व्हावे, असे स्वत:च वाटत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना मात्र मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, एवढे प्रेम शिवसैनिकांकडून मला मिळत आहे,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला. राज्यात सत्तेवर आल्यास राज्य टोलमुक्त करू, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
नाले सफाईच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अवजड उद्योग खात्यावरून नाराजीबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे बोलणे झाले असून हा वाद आता संपला आहे. मोदी सरकारमध्ये अपशकुन करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. मोदी सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा असल्याने उणीदुणी काढण्यापेक्षा कामाला लागायला हवे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. काश्मीरबाबतच्या कलम 370 बाबत उद्धव ठाकरे म्हणाले, हे विशेष कलम काढून टाकण्याबाबत चर्चा सुरू आहे. खरे तर केंद्र सरकारने या कलमावर चर्चा करण्याऐवजी कृती केली पाहिजे.
राज्यात उद्धव सरकार!
केंद्रात मोदी सरकार, तर राज्यात उद्धव ठाकरे सरकार ही कार्यकर्त्यांची घोषणा आहे. मी मुख्यमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांचीच इच्छा असल्यानेच आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहोत, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले की, राज्यात इतरही काही जण मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगून आहेत.