आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचेच नव्हे देशाचे लक्ष, भाजपावर हल्लाबोल करणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज सायंकाळी 5 वाजता महालक्ष्मी रेसकोर्सच्या मैदानावर धडाडणार आहे. उद्धव या सभेद्वारे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग खर्‍या अर्थाने फोडतील. भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच आठवडाभरातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता आहे.
उद्धव आज नेमके काय बोलणार, कोणती गर्जना करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुती, हिंदुत्व, महाराष्ट्राची अस्मिता, भाजपने शेवटच्या क्षणी दिलेला दगा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भ्रष्ट कारभार आदी घटनांवर उद्धव ठाकरे कोणता व कसा प्रहार करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रच नव्हे, देशातील मीडियाचेही या जाहीर सभेकडे लक्ष असेल.
शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतील या पहिल्या सभेने होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील शिवसैनिक उद्धव नेमकी काय भूमिका घेतात आणि आदेश देतात याकडे लक्ष लावून आहेत. जागावाटपावरून महायुती आणि काँग्रेस आघाडीत गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला ताणतणाव, फॉर्म्युले, प्रस्ताव आणि चर्चेचे गुर्‍हाळ आता संपले आहे. आज तीन वाजता अर्ज दाखल करण्याची वेळही संपली आहे.
त्यामुळे बहुतेक नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, प्रचाराला आता ख-या अर्थाने रंग यायला सुरुवात होईल. उद्धव आज प्रचाराचा नारळ वाढविणार आहेत तर, राज ठाकरे उद्या मुंबईतूनच मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडतील.