आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray, Raj Thackeray News In Divya Marathi

राज यांनी मायकल जॅक्सनला का नाचवले;शिवसेनेचा राज यांच्यावर पुन्हा वार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज ठाकरे यांनी मायकल जॅक्सनला मुंबईत आणून का नाचवले, राज ठाकरे यांची मुले इंग्रजी शाळेत का जातात, राज ठाकरे मराठा आरक्षणाला विरोध का करीत आहेत आणि दुबईत अबू आझमीबरोबर पार्टनरशिप का, असे प्रश्न राज ठाकरे यांना एका पत्रकाद्वारे विचारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे प्रश्न शिवसेनेतर्फे विचारण्यात आले आहेत.

राज ठाकरे आणि शिवसेनेतील वाद संपुष्टात आला असल्याची चिन्हे दिसत असतानाच शिवसेनेतर्फे एक पत्रक काढून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना 14 प्रश्न विचारले आहेत. या पत्रकावरून शिवसेना आणि मनसेमध्ये पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसून येऊ लागली आहेत. दादर, गिरगाव, शिवडी, माझगाव अशा बहुसंख्य मराठी मतदार असलेल्या भागामध्ये शिवसेनेने काँग्रेस राजनीती नावाने एक पत्रक मतदारांपर्यंत पोहोचवले आहे. मनसेने शिवसेनेसमोर उमेदवार उभे केल्याने मराठी मतांची विभागणी अटळ होण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मनसेकडे जाणारी मराठी मते रोखण्यासाठी शिवसेनेतर्फे हे पत्रक पाठवल्याचे शिवसेनेतील अतिशय विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात पत्रक वाटणार
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांना विचारले असता त्यांनी पत्रक पाहिले नसल्याचे सांगून आम्हाला प्रश्न विचारण्याचा त्यांना काय अधिकार, असा प्रतिप्रश्न केला. असे पत्रक सध्या मुंबईत वाटण्यात आले आहे. मात्र, येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात हे पत्रक वाटण्यात येतील, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

रमेश किणी प्रकरणात क्लीन चिट मिळाली ?
दक्षिण मध्य मुंबईतील मतदारांना वाटण्यात आलेल्या पत्रकात राज ठाकरे यांनी कधी शेतकर्‍यांसाठी आंदोलन केले आहे का, राज ठाकरे यांचे सल्लागार उत्तर भारतीय कसे, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला राज ठाकरे विरोध का करीत आहेत, राज ठाकरे यांना रमेश किणी हत्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे का, नाशिकचा विकास का केला नाही, किती मराठी तरुणांना राज ठाकरे यांनी नोकर्‍या दिल्या, मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षपदी रिटा गुप्ता का आणि ब्ल्यू प्रिंटचे काय झाले, असे 14 प्रश्न विचारण्यात आले आहेत.