आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Reaction On Sharad Pawar Statement About Assembly Election

विरोधी पक्षातच बसू, पवार जे बोलतात ते कधीच करीत नाहीत- उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शरद पवार ज्या गोष्टीबाबत बोलतात त्या गोष्टी ते कधीच करीत नाहीत. त्यामुळे आम्ही शरद पवारांवर विश्वास ठेवत नाही. राज्यातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षाची जी भूमिका दिली आहे ती आम्ही तूर्तास ठामपणे बजावू अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शरद पवार यांनी आज सकाळी भाजपचे सरकार स्थिर ठेवण्याची मक्तेदारी आम्ही घेतली नसल्याचे सांगत मध्यावधीचे संकेत दिले होते. याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
उद्धव म्हणाले, शरद पवारांनी आज सकाळी जे काही भाष्य केले आहे, त्याबाबत पवारसाहेबांनी आपली मागील वक्तव्ये आठवावीत. शरद पवार जे बोलतात ते कधीच करीत नाहीत. त्यामुळे शरद पवारांवर विश्वास कसा ठेवायचा. आज राज्यातील राजकारणात कोण कोणाबरोबर आहे हे अजून कळत नाहीये. त्यामुळे राज्यातील जनतेने आम्हाला जी विरोधी पक्षात बसण्याची संधी दिली आहे ती आम्ही तूर्तास ठामपणे पार पाडू. शरद पवार जे काही बोलत आहेत त्यावर मी एवढेच बोलतो की, त्यांना परमेश्वराने माफ करावे. फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात होत आहे याबाबत विचारले असता उद्धव यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. भाजपचे काय चालले आहे त्याची माहिती ठेवण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही सध्या विरोधी पक्षात आहे. दरम्यान, उद्धव यांच्या वक्तव्याने पुढील मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार नसल्याचे स्पष्ट संकेत उद्धव यांनी दिले आहेत.
राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत उद्धव यांना विचारले असता ते म्हणाले, काल बाळासाहेब यांचा दुसरा स्मृतिदिन होता. अशा क्षणी राजकीय अर्थ काढणे योग्य होणार नाही. शिवसेना व मनसे एकत्र येऊ शकेल काय यावर उद्धव म्हणाले, भविष्यात काय होईल याबाबत आताच कसे बोलता येईल. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत टीका केली. राज्यातील भाजपचे अस्थिर करण्यास केवळ शरद पवारच कारणीभूत आहेत असे सांगत भाजप-शिवसेना युतीतील रोडा शरद पवारच आहेत असे अप्रत्यक्ष सुचित केले.
आज सकाळपासूनच्या घडामोडी पाहता काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे की, जर राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर काँग्रेस त्याला तयार आहे. शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्यांनी असे भाष्य केल्याने त्याला नक्कीच अर्थ आहे. मात्र, राज्यातील फडणवीस सरकार अस्थिर करण्यामागे भाजपचे नेतृत्त्वच कारणीभूत असल्याची टीका माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.