आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Slam Bjp After Defeat Delhi Assembly Polls

लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते- भाजपच्या जखमेवर उद्धव यांनी चोळले मीठ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील जनता अस्वस्थ आहे हे दिल्लीतील आजच्या निकालाने दाखवून दिले आहे. जनतेला कोणीही गृहित धरू नये. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे आज दिसून आले. दिल्लीतील जनतेने अमिषांना बळी न पडता मतदान केले. त्यामुळे दिल्लीतील आपचा विजय हे लोकशाहीचे कौतुक अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला डागण्या दिल्या. हा किरण बेदींचा पराभव नाही, तर मोदींचाच पराभव या अण्णा हजारेंच्या मताशी सहमत असल्याचे सांगत उद्धव यांनी मोदी-शहा जोडगोळीला भाजपच्या पराभवाचे जबाबदार धरले.
दिल्लीतील आपच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत उद्धव ठाकरे हसतमुख व प्रसन्न दिसत होते. भाजपचा दिल्लीत दारूण झालेला पराभव त्यांच्या चेह-यावरून स्पष्ट दिसत होता. उद्धव म्हणाले, दिल्लीकर लोकांनी केलेले मतदान पाहून आपण थक्क झालो. दिल्लीतील जनतेने नवख्या अशा आम आदमी पक्षाला झाडून मतदान केले. दिल्लीतील जनतेने केजरीवालांवर विश्वास दाखवला आहे. मी केजरीवाल यांचे फोन करून अभिनंदन केले. आता त्यांनी भूतकाळाकडे न पाहता काम करून दाखवावे. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत.
या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उद्धव यांना भाजपबाबत छेडले असता त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली व भाजपला शब्दाशब्दांतून डागण्या दिल्या. दिल्लीकर अमिषाला (उद्धव ठाकरेंनी यावेळी अमित शहा असा त्रोटक शब्द उच्चारला) बळी न पडता मतदान केले. दिल्लीतील भाजपमधील नेत्याला डावलून व न विचारता मोदी-शहा जोडीने बेदींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनविल्याचा तो संदर्भ होता. हा किरण बेदींचा पराभव नाही तर मोदींचाच आहे या अण्णा हजारेंच्या मतांशी सहमत आहात का असे विचारले आपण अण्णांच्या मतांशी सहमत असल्याचे सांगितले. ही निवडणूक म्हणजे दिल्लीकर जनतेने दिल्लीश्वरांना दिलेला इशारा आहे, असे सांगून उद्धव यांनी मोदींकडे बोट दाखवले.
तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे- भाजप
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. जर मोदींवर टीका करायची असेल तर शिवसेनेने सत्तेवर पाणी सोडावे आणि मगच भाजपविरोधात बोलावे असे प्रत्त्युत्तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. शिवसेनेने भाजपबाबत किंवा नरेंद्र मोदींबाबत प्रतिक्रिया देण्यापेक्षा पालघरमध्ये शिवसेनेचा पराभव का झाला व तेथे भाजप का जिंकली याचे विश्लेषण करावे व मत व्यक्त करावे असा चिमटाही शेलार यांनी उद्धव ठाकरेंना हाणला. दरम्यान, यावरून भाजप-शिवसेनेत आगामी काळात चांगलीच जुंपलेली दिसण्याची शक्यता आहे.