मुंबई- देशाचे माजी अर्थमंत्री व भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्लाबोल केल्यानंतर शिवसेनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. शिवसेनेने मुखपत्र सामनात अग्रलेख लिहून उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य सांगितल्याबद्दल आता यशवंत सिन्हा यांनाही बेईमान किंवा राष्ट्रद्रोही ठरवले जाईल असे सांगत भाजप नेतृत्त्वाला उद्धव ठाकरेंनी चिमटे काढले आहेत.
अग्रलेखात म्हटले आहे की, देशाचे मोठे नुकसान सुरू आहे. यावर मी शांत बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेन. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असा तोफखाना यशवंत सिन्हा यांनी सोडला आहे. सिन्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यामुळे त्यांची विधाने सोशल मीडियावर नेमलेल्या पगारी प्रचारकांच्या फौजा सोडून खोडता येणार नाहीत.‘मी गरिबी अतिशय जवळून अनुभवली आहे,’ असे पंतप्रधान अनेकदा सांगतात. जनतेने याच गरिबीचा अनुभव घ्यावा यासाठी पंतप्रधानांचे अर्थमंत्री मेहनत घेत आहेत, असे यशवंत सिन्हा म्हणतात. यावर आम्हाला काहीच म्हणायचे नाही. हे सर्व आम्ही वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्रोही ठरलो होतो. आता यशवंत सिन्हा ठरतील! अशा शब्दांत 'सामना'तून टीकास्त्र सोडले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, अर्थमंत्री पदावर प्रदीर्घ काळ राहिलेले हे लोक (मनमोहन सिंग, पी. चिंदबरम) मूर्ख व आपण तेवढे शहाणे (मोदी, शहा, जेटली) या भ्रमाचा भोपळा यशवंत सिन्हा या भाजपच्याच माजी अर्थमंत्र्यांनी फोडला आहे. देशाचा विकास दर हा ५.७ टक्के असल्याचे सांगितले जाते. तो प्रत्यक्षात ३.७ टक्केच असल्याचे बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा हे बेइमान किंवा राष्ट्रद्रोही ठरवले जाऊ शकतात. रशियात स्टॅलिन राजवटीत सरकारविरुद्ध मत मांडणारे, सत्य बोलणारे अनेक लोक एका रात्रीत गायब होत किंवा त्यांची रवानगी श्रम छावण्यांत होत असे. यशवंत सिन्हा यांना सत्य सांगितल्याबद्दल कोणत्या शिक्षेस तोंड द्यावे लागेल ते पाहू. पण नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचा कसा फज्जा उडाला व देशात आर्थिक मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर सिन्हा यांनी झोत टाकला आहे. विकास दर घसरत असताना नोटाबंदीचा जो निर्णय घेतला तो आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, असेही सिन्हा म्हणतात. सध्या अनेक बाबतीत सरकारी योजनांची वाताहत सुरू असली तरी जाहिरातबाजीचे डोस देऊन यशाचे ढोल वाजवले जात आहेत. उद्योग, मेक इन इंडियासारखे ‘मोदी फेस्ट’ कसे अपयशी ठरत आहेत व कोटय़वधी रुपयांची उधळण करूनही जनतेने या ‘फेस्ट’कडे कशी पाठ फिरवली आहे ते विदारक चित्र प्रसिद्धीमाध्यमांनी उघडे पाडले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, उद्धव ठाकरे आणखी काय म्हणताहेत...