आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची घसरगुंडी वेदनादायी, पैशाने लोकभावना विकत घेता येत नाही- उद्धव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नगरपंचायतींचे निकाल संमिश्र लागले. भाजपला अनेक ठिकाणी अस्तित्वासाठी झगडावे लागले. सत्तेची मधुर फळे जनतेच्या मुखी न लागता दुसरेच कोणीतरी लुटालूट करीत आहे. हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना प्रत्येक वेळी विकत घेता येईलच असे नाही. शिवसेनेने या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. मात्र त्याचवेळी भाजपची झालेली घसरगुंडी आमच्यासाठी वेदनादायी आहे. काही झाले तरी तो आमचा जुना मित्रपक्ष आहे, अशी कोपरकळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला मारली आहे.
राज्यातील नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींचे निकाल नुकतेच लागले. या नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची धूळधाण उडाली आहे. राज्यात नव्याने गठीत झालेल्या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. 102 जागांपैकी काँग्रेसने 21 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी व शिवसेनेस प्रत्येकी 20 जागा मिळाल्या तर अपक्षांनी 36 जागा जिंकल्या. भाजपचे अधिकृत म्हणजे कमळाच्या चिन्हावर फक्त पाच उमेदवार जिंकून आले. जानेवारी महिन्यात राज्यातील 289 पंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यातही भाजपास लोकांनी साफ झिडकारल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला आनंदाच्या उखळ्या फुटल्या आहेत. त्याचाच संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त अग्रलेख लिहून भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यात बदलाचे वारे इतक्या लवकर वाहू लागतील असे वाटले नव्हते, पण नगरपंचायत निवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची जी धूळधाण उडाली आहे तो सर्व प्रकार धक्कादायकच म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्ष सध्या सत्तेवर आहे व त्यांचे मंत्री तसेच पुढारी विकासाच्या नव्या घोषणांचे नारळ रोज वाढवत आहेत, पण त्या नारळात पाणी व खोबरे दोन्ही नसल्याने नुसत्या करवंट्यांचेच आवाज येत आहेत. काँगे्रस पक्षाला महाराष्ट्रात नेतृत्व नाही व पाठबळही नाही. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांच्या नेत्यांच्या अटका सुरू असूनही त्या पक्षाने भाजपास मागे ढकलून पुढे जावे याचेच आश्‍चर्य वाटते. पंचायती, जिल्हा परिषदांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राचे जनमानस नाही, असे खुलासे आता होतील. पण त्या लपवाछपवीस अर्थ नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला हाणला आहे.
पुढे आणखी वाचा, उद्धव ठाकरे यांनी आणखी काय म्हटले आहे भाजपला...