(छायाचित्र: उद्धव ठाकरे पंचायत कार्यक्रमात बोलताना)
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आल्यास
आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज दिले. मुंबईत 'आज तक' या वाहिनीने आयोजित केलेल्या पंचायत या कार्यक्रमांतर्गत उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेला परिवर्तन हवे आहे. लोक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला कंटाळले आहेत. आम्हाला महाराष्ट्र पुन्हा नंबर वनवर न्यायचा आहे. त्यासाठी लोक जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मी दिल्लीत गेलो होतो तेव्हा देशाला चेहरा हवा असे सांगितले होते. तेव्हा
नरेंद्र मोदी पुढे आले आणि देशाने त्यांना पंतप्रधानपदी बसविले. राज्याच्या निवडणुकीतही महायुती चेहरा देणार का यावर उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे हाच चेहरा आहे. मी माझा चेहरा का मानू नये. जर लोक माझ्यावर विश्वास ठेवत असतील तर त्यात चुकीचे काय आहे. काय आम्ही भावी मुख्यमंत्र्यांशी बोलत आहोत काय?, असा उद्धव यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. मी स्वप्नं पाहत नाही पण कोणत्याही जबाबदारी मिळाल्यास त्यापासून पळून जाणार नाही असे सांगत मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
भाजपसोबत कोणतेही मतभेद नाहीत. गेल्या 25 वर्षापासून आमची असलेली युती जगातील एकमेव उदाहरण असेल, असे सांगत महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न दोन-तीन दिवसात सुटेल असे सांगितले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना मोठा भाऊ नाही, असे भाजप सांगत आहे यावर शिवसेना-भाजप किती जागांवर लढेल असे विचारले असता उद्धव म्हणाले, चर्चा सुरु आहे. आम्ही जेवढ्या जागा लढवू त्या सोडून भाजप जागा लढवेल, असे सांगत आम्हीच मोठा भाऊ राहू असे उद्धव यांनी स्पष्ट केले.