आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी हुकूमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल : उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, अच्छे दिनची खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताची अर्थव्यवस्था चीनच्या कम्यूनिझमच्या दिशेने चालली का ? - Divya Marathi
भारताची अर्थव्यवस्था चीनच्या कम्यूनिझमच्या दिशेने चालली का ?
मुंबई- देशाची वाटचाल चीनच्या दिशेने चालली असून देशात चीनसारखा कम्युनिझम चालणार नाही, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता इशारा दिला. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून देशात निर्माण झालेल्या स्थितीवरही त्यांनी टीका केली, ‘तुमचे अच्छे दिन कधी येणार, मरणानंतर का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेनेचा राज्यव्यापी मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी बोलताना उद्धव म्हणाले, काही वर्षांपूर्वी चीनला गेलो तेव्हा बीजिंगजवळील एका गावात गेलो होतो. तेथे ऑलिंपिक होणार होते. तेथे फक्त चिनी भाषाच बोलली जात असल्याने इंग्रजी बोलणारा गाईड घ्यावा लागत होता. त्या गावात एक अत्यंत उत्कृष्ट इंग्रजी बोलणारा परंतु फाटक्या कपड्यातील गाईड आम्हाला मिळाला. मी त्याला म्हटले, इतके चांगले इंग्रजी बोलतोस, मग बीजिंगमध्ये जाऊन जास्त पैसे का कमवत नाहीस? यावर गाईडने सांगितले की, “मी येथे काहीही बोलू शकतो परंतु बीजिंग येथे जाऊन सरकारविरोधात काही बोललो तर मला गायब केले जाईल. सध्या देशातही तशीच अवस्था आहे. परंतु देशात कम्युनिझम चालणार नाही.’

घोषणांची दिशाभूल
सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात बोललो की बेईमान म्हटले जाते. अच्छे दिनचे मृगजळ जनतेला दाखवले जात आहे. अच्छे दिनच्या जुमल्यावर त्यांनी इमले बांधले. नोटाबंदीची चूक लक्षात आल्याने आता घोषणांची भूल दिली जात आहे, असा आरोपही उद्धव यांनी भाजपवर केला. सुरुवातीला माझ्यावर घराणेशाहीचा आरोप झाला. घराण्याचे गुण किती घेतले माहीत नाही पण एक अवगुण आला आणि तो म्हणजे जे पटत नाही त्याविरोधात बोलणारच, असेही ते म्हणाले.

काळ्या पैशाविरुद्ध आम्ही पंतप्रधानांसोबत...
भ्रष्टाचार, काळा पैसा, खोट्या नोटांविरोधातील लढाईत आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत. परंतु शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बँकांवर नोटा बदलून देण्यासाठी बंदी का घातली, अजून ती पूर्णपणे का उठवली नाही, असा प्रश्न उद्धव यांनी केला. नव्या नोट्या जिल्हा बँकांमधून बाहेर आल्या नाहीत त्या अन्य बँकांमधून आल्या. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी जिल्हा बँकांवरच कारवाई केली, असे उद्धव म्हणाले.

कार्यकर्त्यांना मान द्या : गुलाबराव पाटील 
खासदार, आमदार, मंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांना विसरू नका त्यांना मान द्या, त्यांचे ऐका. कार्यकर्तेच तुम्हाला पुढे घेऊन जातात, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना दिला.  मी टपरीवाला होतो आणि आज शिवसेनेमुळे मंत्री झालो. पक्षाशी एकनिष्ठ राहिलात तरच पुढे जाता येते, पक्षापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करू नका. पक्षच मोठा करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव म्हणाले...
- पंतप्रधानांनी भाषणात नाबार्डला आणखी २१ हजार कोटी देऊ, असे सांगितले. परंतु नाबार्ड दरवर्षीच २१ हजार कोटी देते ते कधीही जाहीर केले नाही.
- पुणे मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते केले आणि हरित लवादाने त्याला स्टे दिला. सवंग लोकप्रियतेसाठी पंतप्रधानांचा अपमान कशाला?
- पंतप्रधान आवास (अगोदर ‘आभास’ शब्द उच्चारला) योजनेचे फॉर्म भरून घेतले; परंतु अजून योजना सुरू झाली नाही. घर देणार कुठे, याची माहितीही द्यायला हवी.
- स्थानिक आघाडीवर शिवसेनेने फक्त भाजपबरोबर युती करावी, असे मी सांगितले होते. परंतु त्यांनी एमआयएम आणि कोणा-कोणाबरोबर युती केली हे सगळ्याना ठाऊक आहे.
- महापालिकेसाठी युती करायची की नाही याचा निर्णय मी घेईन. परंतु कोणत्याही परिस्थितीत लाचारी पत्करून युती करणार नाही.
- नोटाबंदीमुळे बेकार झालेल्यांना नोकरी द्यावी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना केली.
बातम्या आणखी आहेत...