आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदुना दिलेल्‍या त्‍या 3 वचनांचे काय? उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्‍हा केले लक्ष्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्‍यान संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्‍यात याचे पडसाद मात्र आताच पडताना दिसत आहे. अधिवेशनात सरकारतर्फे तिहेरी तलाकविरोधात विधेयक मांडण्‍यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्‍हा एकदा लक्ष्‍य केले आहे. 'तलाकबंदीचा ‘कोंबडा’ आगामी संसद अधिवेशनात जरूर आरवू द्या, मात्र त्याचवेळी समान नागरी कायदा, ३७० वे कलम, रामजन्मभूमी या तीन वचनांचा ‘शंखध्वनी’ही एकदाचा होऊनच जाऊ द्या. तलाकबंदीची वचनपूर्ती होत असताना हिंदूंना दिलेल्या या ‘तिहेरी वचनां’चे काय? हा प्रश्न देशवासीयांच्या मनात येऊ नये इतकेच आम्हाला म्हणायचे आहे', असे सामनाच्‍या संपादकीयमध्‍ये म्‍हटले आहे.

 

संपादकीयमधून भाजपला टोले  
- 'तीन महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शायरा बानो प्रकरणात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला होता. त्याचवेळी तोंडी तलाक देणे हा गुन्हा ठरविण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, त्यादृष्टीने कायदा करणे ही संसदेची जबाबदारी आहे असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या असून स्वतंत्र विधेयक किंवा कायद्याच्या प्रचलित तरतुदींमध्ये दुरुस्त्या करण्याचा सरकारचा विचार आहे. हा विचार जरूर स्वागतार्ह आहे, पण त्यानुसार हिवाळी अधिवेशनात तलाकबंदी विधेयक मांडण्याचा ‘आचार’देखील होणे आवश्यक आहे. कारण आपल्याकडे अनेक चांगले विचार फक्त विचारच राहतात असा पूर्वानुभव आहे.' अशा शब्‍दात भाजपवर अप्रत्‍यक्षपणे टीका करण्‍यात आली आहे.


हिंदुना दिलेल्‍या त्‍या तिहेरी वचनांचे काय?
- संपादकीयमध्‍ये म्‍हटले आहे की, 'तलाकबंदीबाबत जसे न्यायालयीन निर्देशाचे पालन केले जात आहे तोच कित्ता समान नागरी कायद्याबाबतही गिरवला जाऊ शकतो. घटनेच्या ३७० व्या कलमाचे म्हणाल तर त्यात खोडा जम्मू-कश्मीरमधील राजकीय मंडळीच घालतील. मात्र त्यापैकी एक तर केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्याच सोबतीने राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. राहिला प्रश्न अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचा. उत्तर प्रदेशातदेखील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचेच प्रचंड बहुमताचे सरकार सत्तेवर आहे. तेव्हा मनात आणले तर समान नागरी कायदा, ३७० वे कलम आणि रामजन्मभूमी या तिन्ही वचनांची पूर्ततादेखील केंद्र सरकार करू शकते.'
- तलाकबंदीची वचनपूर्ती होत असताना हिंदूंना दिलेल्या या ‘तिहेरी वचनां’चे काय, हा प्रश्न देशवासीयांच्या मनात येऊ नये इतकेच आम्हाला म्हणायचे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...