आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला आता \'चल हट’ म्हणण्याची वेळ: उद्धव ठाकरे, भाजपच्या जाहिरातीवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुण्यातील सभेत व्यंकय्या नायडू यांनी मुळा-मुठा नद्यांची नावे बदला, असे म्हटले. नदीचे नाव मुळा नाहीतर काय गाजर ठेवायचे, असा प्रश्न करत बदलायचे असेल तर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे करा. तसेच विमानतळाला छत्रपती संभाजीराजांचे नाव द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत निवडणूक प्रचाराच्या समारोपाच्या भाषणात केली. 
 
आता भाजपला ‘चल हट’ म्हणण्याची वेळ आली असून शिवसैनिक भाजपला त्यांची औकात दाखवतील, असेही म्हटले. राज ठाकरे यांचे नाव न घेता महापौर बंगला हडपण्याचा आमचा विचार असल्याचे म्हणणारे मग युतीसाठी का आले, असा प्रश्नही उपस्थित केला.  

वांद्रे बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात शिवसेनेची भव्य सभा झाली. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुण्याच्या पारदर्शक सभेची खिल्ली उडवत म्हटले, पुण्याची मुख्यमंत्र्यांची सभा खरोखरच पारदर्शक झाली. नंतर मुख्यमंत्रीही पारदर्शक झाले. आता थोड्या वेळापूर्वी  पलीकडे त्यांची सभा आहे.
 
तिथून निरोप आला की तुमची सभा आटपा, आमच्या खुर्च्या भरायच्या आहेत. त्यांनी आमच्यावर ‘लेना बँक’ म्हणून आरोप केला. परंतु त्यांच्यासारख्या आमच्या खुर्च्या रिकाम्या नाहीत. आमची भरगच्च भरलेली बँक आहे. त्यांची नो अॅक्सिस बँक आहे. आमच्या आरोग्य कवच योजनेचे उद््घाटन मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार असून त्यांचे डोळे तपासले जातील आणि त्यांना मुंबईत पाटणा कुठे दिसते ते दाखवण्यास सांगू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  

कोट्यवधी रुपये नरेंद्र मोदींकडे गेले का ?  
आता तर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. असे आरोप करणाऱ्यांनी नमामी गंगा योजनेत गंगेचा एक थेंब तरी स्वच्छ केला का, असा प्रश्न करत नमामी गंगे योजनेचे कोट्यवधी रुपये नरेंद्र मोदी यांच्या खिशात गेले का, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.  शरद पवार यांना पद्मविभूषण देतात, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का नाही, असा प्रश्नही या वेळी ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान, या सभेला मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आईचा अपमान करणाऱ्या भाजपच्या जाहिराती  
भाजपकडे ना संस्कार ना संस्कृती. त्यामुळेच आईचा अपमान करणाऱ्या जाहिराती केल्या जातात. भाजपला नाते करताही येत नाही आणि जपताही येत नाही. सीसीटीव्ही लावून मुंबई सुरक्षित राहणार हा भाजपचा दावा चुकीचा आहे. कालपरवा भिवंडीत काय झाले? ते सीसीटीव्हीत आलेच आहे. काँग्रेसच्या मनोज म्हात्रे यांची हत्या करणारा भाजपचा उपाध्यक्ष असून तो फरार आहे. सीसीटीव्हीचा काय फायदा? या हल्लेखोरांना ठेचून मारा. शिवसेनेत गुंड आहेत असे म्हणणाऱ्या भाजपने गुंडांना प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे. मुंबईला फक्त शिवसेनाच सुरक्षित ठेवू शकते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.   
 
बातम्या आणखी आहेत...