आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhav Thackeray News In Marathi, Ekveera Mata Darshan

नवनिर्वाचित खासदारांसह उद्धव ठाकरे फेडणार नवस; आज एकवीराचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकवीरा मातेला आणि सिंधुदुर्गचा खासदार निवडून येऊ दे म्हणून भराडी देवीकडे नवस केला होता. त्यानुसार शिवसेनेचे राज्यात 18 खासदार निवडून आल्याने उद्धव ठाकरे आपला नवस फेडण्यासाठी शुक्रवारी एकवीरा देवीच्या तर रविवारी कोकणात भराडी मातेच्या दर्शनाला जाणार आहेत.

सिंधुदुर्गात शिवसेनेला विजय मिळाल्यास खासदाराला घेऊन दर्शनाला येईन, असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली सभेत घातले होते. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या नीलेश राणे यांचा दणदणीत पराभव करीत कोकणात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यामुळेच उद्धव ठाकरे निकालाच्या दिवशीच विनायक राऊत यांच्या विजयी यात्रेत सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्गला गेले होते.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार मोठय़ा प्रमाणात निवडून दे, असे साकडे कार्ला येथील एकवीरा मातेला घातले होते. शिवसेनेला मिळालेला विजय हा या दोन्ही नवसांचा प्रसाद असल्याचे मानत शुक्रवारी सकाळी उद्धव ठाकरे आपल्या सर्व म्हणजे 18 नवनिर्वाचित खासदारांसोबत एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी कार्ला येथे जाणार आहेत. यानंतर रविवारी ते विनायक राऊत यांच्यासोबत आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या दर्शनाला जाणार असून देवीची खणा-नारळाने ओटी भरून आपला नवस पूर्ण करणार आहेत.