आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेः उजनीचे पाणी लातूरला रेल्वेने नेणार, औरंगाबादमधील डॉप्लर रडार कार्यांवित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लातूर, उस्मानाबाद, बीड येथे पाऊस नसल्याने पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवली आहे. लातूरला पाणीप्रश्न खूपच गंभीर आहे. सध्या उजनी धरणात पाणीसाठा वाढला असून पंढरपूरच्या वाट्याचे काही पाणी लातूरला रेल्वेद्वारे पोहोचवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

कृत्रिम पावसासाठी लागणारे डॉप्लर रडार औरंगाबाद येथे बसवण्यात आले असून ते शनिवारपासून कार्यरत होईल. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करणे सोपे जाईल. या डॉप्लर रडारमुळे ढगांची जमिनीपासूनची उंची, त्यातील आर्द्रता समजण्यास मदत होईल आणि त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडणे सोपे होईल. या योजनेसाठी २७ कोटी रुपये खर्च केले जाणार असून ९० दिवस २०० तास ही मोहीम सुरू राहाणार आहे. पहिले प्रयोग यशस्वी झाल्याने दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडणे सोपे होईल. गेल्या वर्षी दुष्काळाकरिता दोन हजार कोटी रुपये खर्च केले होते त्यापेक्षा ही रक्कम कमी असल्याचेही खडसे म्हणाले.

सहा लाख हेक्टरवरच दुबार
पावसाळा सुरू झाल्यानंतरही वरुणराजाने पाठ फिरवल्याने राज्यातील दहा लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते, परंतु अाता पाऊस पडल्याने आता फक्त सहा लाख हेक्टरवरच दुबार पेरणीचे संकट आहे. भविष्यात पावसाची शक्यता असल्याने हे संकट टळेल. लातूर, उस्मानाबाद, बीड येथे मात्र संकट मोठे आहे. उजनी धरणातून पंढरपूरला पाणी दिले जाते. यात्रा वगळून पंढरपुरात पाणी शिल्लक राहते. हे पाणी रेल्वेद्वारे लातूरला नेण्याचा विचार आम्ही करत आहोत. टँकरद्वारे पाणी पुरवण्याऐवजी हे स्वस्त पडणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाशी बोलून पंढरपूरचे पाणी लातूरला कसे नेता येईल याबाबत लवकरच
निर्णय घेतला जाईल, असेही खडसे यांनी सांगितले.
कृत्रिम पाऊस यशस्वी ठरल्याचा दावा
खडसे म्हणाले, राज्यात पाऊस म्हणावा तसा नाही, त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा लागत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. चार आणि पाच ऑगस्टला केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने शेवगाव येथे १४.६ मिमी, एरंडगाव येथे ३३ मिमी, नेवासा खुर्द येथे १२ मिमी, नेवासा बुद्रुक येथे ९ मिमी, बीड येथील लिंबागणेश येथे १७ मिमी, नांदवली ११ मिमी असा पाऊस पडला. दुबार पेरणीसाठी ५ मिमी पाऊस आवश्यक असतो. कृत्रिम पाऊस त्यापेक्षा जास्त पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...