आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांडपाणी वापराची मुंबईकरांना सक्ती; 10 टक्के बचत होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- घरातून सोडलेले किचन, बाथरूम आणि टॉयलेटचे पाणी सध्या मलवाहिनीतून वाहून नेण्यात येते, परंतु मुंबई पालिकेने किचन आणि बाथरूमचे पाणी वेगळे काढून सोसायट्यांमध्ये शुद्ध करण्याची योजना आखली असून मुंबईतील सर्व हाऊसिंग सोसायट्यांना त्याची सक्ती करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका दर एक हजार लिटर्स पाण्यासाठी 12 रुपये खर्च करते. नागरिकांना मात्र 4 रुपये दराने पाणीपुरवठा होतो. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर वाढल्यामुळे सांडपाण्याच्या पुनर्वापराची ‘ग्रे वॉटर’ योजना आखण्यात आली आहे. राजधानीतील सर्व हौसिंग सोसायट्यांना या योजनेची सक्ती करण्यात येणार आहे.

60 सदनिकांच्या इमारतीला सक्ती

ठाणे जिल्हय़ात असणार्‍या सात धरणांतून महापालिका पाणी वाहून आणते. त्यातील 30 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. त्यामुळे पालिकेने सांडपाण्याच्या पुनर्रवापरावर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखली आहे. 60 सदनिका असणार्‍या प्रत्येक इमारतीला ग्रे वॉटर योजनेची सक्ती करण्यात येणार आहे. बाथरूम आणि किचनचे पाणी वेगळे काढून त्या त्या सोसायटीत जमा केले जाईल. टॉयलेटचे पाणीच केवळ मलवाहिनीत सोडले जाईल.

सोसायटीच्या टाकीमध्ये साठवलेले ग्रे वॉटर कार्बन फिल्टरद्धारे शुद्ध केले जाणार आहे. शुद्ध केलेल्या ग्रे वॉटरचा वापर बगीचा, गाड्या धुण्यासाठी करता येईल. या योजनेची अंमलबजावणी केल्यास मुंबईतील पिण्याच्या पाण्यात 10 टक्के बचत होईल, असा दावा महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून केला जात आहे.

ग्रे वॉटर योजना नागरिकांच्या तक्रारींसाठी पुढच्या आठवड्यात खुली केली जाणार आहे. दोन हजार लिटर्स सांडपाणी प्रतिदिन शुद्ध करण्यासाठी सोसायट्यांना 20 हजार रुपयांची एकदाच गुंतवणूक करावी लागेल.