आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या या प्रॉपर्टीचा होईल लिलाव; सरकारने ठेवली 5 कोटी रुपये बेस प्राईज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईस्थित तीन मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील हॉटेल रोनक अफरोज, शबनम गेस्ट हाऊस आणि डामरवाला बिल्डिंगमधील पाच सदनिकांचा या लिलावात समावेश आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी यापैकी रौनक अफरोज हॉटेलची लिलावाद्वारे विक्री झाली होती. निवृत्त पत्रकार एस. बालकृष्णन यांनी तब्बल ४.२८ कोटी बोली लावली होती. मात्र, बालकृष्णन यांनी विहित कालावधीत खरेदी रकमेचा भरणा न केल्याने विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती.    

दाऊदच्या मुंबईतील बारा मालमत्ता आयकर विभागाच्या ताब्यात असून या मालमत्तांचा टप्प्याटप्प्याने लिलाव होणार आहे. यापैकी तीन मालमत्तांचा १४ नोव्हेंबरला चर्चगेट येथील आयएमसी इमारतीमधील किलाचंद कॉन्फरन्स रूममध्ये जाहीर लिलाव होणार अाहे. त्यासाठी www.eauction.auctiontiger.net वर बोलीही लावता येणार आहे. या तीन मालमत्तांपैकी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर राहत असलेल्या पाकमाेडिया स्ट्रीटवरील डामरवाला बिल्डिंगमधील खोली क्र १८,२०,२५,२६ आणि २८ या पाच खोल्यांची एकत्रित राखीव किंमत १ कोटी ५५ लाख ७६ हजार इतकी अाहे, तर भेंडी बाजारातील हॉटेल रौनक अफरोज या व्यापारी गाळ्याची राखीव किंमत १ कोटी १८ लाख ६३ हजार तसेच याच मार्गावरील शबनम गेस्ट हाऊस या दुमजली इमारतीची राखीव किंमत १ कोटी २१ लाख ४३ हजार इतकी निश्चित करण्यात आली आहे.    

खरेदीदार कोण?   
दोन वर्षांपूर्वी हॉटेल रौनक अफरोजसाठी झालेल्या लिलावात मुंबईतील दाऊदी बोहरा समाज ट्रस्ट आणि पत्रकार एस. बालकृष्णन यांची देशसेवा समिती हे दोघे सहभागी झाले होते. त्या वेळीही या मालमत्तेची किंमत १ कोटी १८ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. सुमारे दोन तास चाललेल्या या बोलीत दाऊदी बोहरा समाज ट्रस्टच्या वतीने ४ कोटी २७ लाखांपर्यंतची बोली लावली गेली, तर त्यापेक्षा एक लाख रुपये अधिक बोली लावत बालकृष्णन यांनी ४ कोटी २८ लाखांत ही मालमत्ता खरेदी केली होती. मात्र, नियमानुसार संपूर्ण रक्कम न भरल्याने बालकृष्णन यांना या हॉटेलची खरेदी करता आली नाही. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे कारण म्हणजे गुंडगिरीविरोधात सर्वसामान्यांमध्ये असलेले भय कमी करणे, अशी प्रतिक्रिया बालकृष्णन यांनी दिली होती. या  वेळी कोण बोली लावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दाऊदच्या इतर मालमत्तांचा होणार टप्प्याटप्प्याने लिलाव   
हॉटेल रौनक अफरोज आणि डामरवाला बिल्डिंग या दोन मालमत्तांव्यतिरिक्त पाकमोडिया स्ट्रीटवरील दोन व्यावसायिक गाळे, याकुब स्ट्रीटवरील दोन व्यावसायिक गाळे, जयराजभाई लेन ताडदेव येथील तीन व्यावसायिक गाळे, टेमकर स्ट्रीटवरील प्लॉट क्रमांक २२, घासवाला बिल्डिंगमधील दोन सदनिका, म्हाडामधील क्रमांक ४९, नागपाडा येथील गॉर्डन हॉल इमारतीतील सदनिका आणि इस्माईल बिल्डिंग अशा उर्वरित मालमत्ताही आयकर विभागाच्या ताब्यात असून टप्प्याटप्प्याने त्यांचाही लिलाव केला जाणार आहे.

पुढील स्लाइडवर पाहा... अर्थमंत्रालयाने दिलेली जाहिरात..
बातम्या आणखी आहेत...