मुंबई - दयेचे अर्ज फार काळ प्रलंबित ठेवणे शक्य नसल्याचे सरन्यायाधीश पी सदाशिवम यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात एकाच वेळी 15 दया अर्जांवर निकाल देत फाशीच्या शिक्षा जन्मठेपेत बदलल्या होत्या. या निर्णयाचे सरन्यायाधीश त्यांनी समर्थन केले.
दया याचिकेत अनावश्यक उशीर झाल्यास फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
स्पीकिंग ट्रस्ट आणि सीबीआयच्या वतीने ‘इम्प्रुव्हिंग क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख वक्ते म्हणून सदाशिवम बोलत होते. दयेचा अर्ज करणे हा आरोपीचा अधिकार असून त्यावर योग्य निर्णय घेणे हे न्यायालयाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
घटनेतील 21 व्या कलमानुसार फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीलाही जगण्याचा अधिकार देण्यात आला असल्याचे सदाशिवम यांनी या वेळी स्पष्ट केले. पण म्हणून न्यायालय क्रूर गुन्हेगारांच्या बाबतीतही नरमाईची भूमिका घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.दया अर्जांचा निपटारा करण्यासाठी न्यायालयाने गेल्या महिन्यात दिशानिर्देश जारी केले.