आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unicef Survey : Malnutrition Still In Maharashtra

युनिसेफचे सर्वेक्षण:पुरोगामी महाराष्‍ट्रावर अजूनही कुपोषणाचा डाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उद्योग, कृषी, शिक्षण, नागरीकरण आणि रोजगार या क्षेत्रात अव्वल असल्याची शेखी मिरवणा-या पुरोगामी महाराष्‍ट्रात आजही दोन वर्षांच्या आतील 22.8 टक्के बालके कुपोषणग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती ‘युनिसेफ’ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे.
‘युनिसेफ’ संस्थेने तयार केलेल्या राज्यातील कुपोषण स्थितीविषयक अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. 2012 मध्ये सदर सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यामध्ये दोन वर्षांच्या आतील बालकांची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणातून राज्यकर्त्यांचे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी माहिती पुढे आली. 2006 मध्ये राज्यात कुपोषित बालकांची संख्या 39 टक्के होती, हेच प्रमाण आता 22.8 टक्के इतके खाली आले आहे.
या सर्वेक्षणात कुपोषणाचे प्रमाण विभागानुसार नोंदवण्यात आले आहे. सहा विभागापैकी सर्वाधिक कुपोषण नाशिक विभागात (32.3 टक्के) आहे. दुस-या क्रमांकावर असलेल्या मराठवाड्यात 24. 5 टक्के कुपोषित बालके आढळली आहेत. तर कोकण विभागात हे प्रमाण 23. 4 टक्के आहे. विदर्भातील कुपोषणाची स्थिती झपाट्याने सुधारत असल्याचे आशादायक चित्र अहवालातून समोर आले आहे. अमरावती विभागात 23.5 तर नागपूर विभागात 15.3 टक्के कुपोषणाचे प्रमाण आहे. पुणे विभागात 16.7 टक्के कुपोषणग्रस्त बालके आढळल्याचे अहवाल सांगतो. कुपोषणाचे प्रमाण मागास जातींमध्ये जास्त असल्याचेही या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.अनुसूचित जातीमधील (एससी) कुपोषित बालकांचे प्रमाण 26 टक्के तर अनुसूचित जमाती (एसटी) मधील हे प्रमाण 32.1 टक्के आहे.
नाशिकचे चित्र विदारक
मुंबई, पुणे आणि नाशिक हा राज्यातील सर्वात विकसित ‘गोल्डन ट्रँगल’ म्हणून ओळखला जातो; परंतु या विभागात राज्यात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण नोंदवले गेल्याने नाशिकच्या गतिमान विकासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूरमध्ये सर्वात नीचांकी
विदर्भात कुपोषणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. नागपूर विभागात केवळ 15.3 टक्के प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या 6 विभागांपैकी सर्वात कमी कुपोषण या विभागात असल्याचे युनिसेफचा अहवाल सांगतो.
मागास जातीतील बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज
श्रीमंत घरातही कुपोषण
दारिद्र्यरेषेखालील घरांत कुपोषित बालके असतातच; परंतु आर्थिक स्थिती उत्तम असणा-या घरांमध्येही काही ठिकाणी कुपोषित बालके आढळली आहेत. आहार साक्षरतेच्या अभावामुळे खात्यापित्या घरची बालके कुपोषित झाल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
ग्रामीण भागात गंभीर चित्र
राज्यात कुपोषणग्रस्त बालकांची टक्केवारी 22.8 आहे. त्यातील 24.6 टक्के बालके ग्रामीण भागातील असून 18.5 टक्के शहरी भागातील असल्याचे अहवालात नमूद आहे.
परिस्थितीत सुधारणा
४2006 मध्ये राज्यात 39 टक्के कुपोषण होते, आता त्याचे प्रमाण घटून 22.8 टक्क्यांवर आले आहे. कुपोषणावर आपल्याला पूर्ण विजय मिळालेला नाही. परंतु आपण मोठा पल्ला गाठला आहे, यात शंका नाही.
पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री