आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Make Sugarcane Rate Serious Problem, Sharad Pawar Attack On Modi Government

केंद्रामुळे ऊसदराचा प्रश्न गंभीर, शरद पवार यांचा नरेंद्र मोदी सरकारवर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऊस उत्पादक शेतकरी व साखरेचा गंभीर होत चाललेला प्रश्न सोडवायचा असेल तर केंद्राने साखर निर्यातीवर टनामागे ७०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी केली. गेल्या वर्षी यूपीए सरकारने टनामागे ३३० रुपये अनुदान दिले होते. त्यामुळे २० लाख टन साखर निर्यात होऊन ५ हजार कोटी मिळाले होते. पण, भाजप सरकारने हे अनुदान थांबवल्याने साखर देशाबाहेर जात नाही आणि म्हणूनच ऊसदराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोपही पवारांनी केला.
राष्ट्रवादी भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवारांनी ऊस व साखरेचे गणित समजावून सांगितले.
‘राज्यात १२ जानेवारीपर्यंत ३७८ लाख ११ हजार टन ऊस गाळप झाले असून अद्याप ५०० लाखांपेक्षा अधिक टन उसाचे गाळप बाकी आहे. हे संकट याआधीही आले होते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. मी दहा वर्षे कृषिमंत्रिपद सांभाळले आहे. या दरम्यान तीनवेळा साखरेचे संकट आले होते. साखरेचा बफर स्टॉक ठेवून त्यावर कारखान्यांनी कर्ज देणे, एक्साइज कराच्या रकमेएवढे कर्ज तीन वर्षांसाठी साखर कारखान्यांना उपलब्ध करून देणे तसेच ऊस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन मदत देणे, अशा पर्यायातून या संकटावर तोडगा काढला होता,’ याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

सहकारमंत्र्यांना आता साखर खातेही द्या!
राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही पवारांनी जोरदार टीका केली. ‘एफआरपीनुसार उसाचा प्रतिक्विंटल भाव २१०० पर्यंत जात असून त्यानंतर प्रतिटन प्रक्रियेचा खर्च ७०० रुपयांपर्यंत आहे. मात्र साखरेचा प्रतिटन दर २४५० असल्याने कारखाने तोट्यात जात आहेत. या परिस्थितीत उसाला हमीभाव न देणा-या कारखान्यांची साखर जप्त करण्याची भाषा सहकार मंत्री करत असतील तर त्यांनी ते करूनच दाखवावे. त्याचबरोबर साखर साठ्यांवरील बँकेचे जे कर्ज असते त्याचे व्याज व हप्तेही सरकारने द्यावेत. याशिवाय कारखान्यांचा वर्षभराचा खर्च, कामगारांचे पगारही त्यांनी दिले पाहिजेत. माझी तर सूचना अशी आहे, की सरकारनेच आता साखर कारखाने चालवावेत आणि साखर व्यवसाय असे नवे खाते तयार करून ते चंद्रकांत पाटील यांच्याकडे द्यावे, असा टोला पवारांनी लगावला.

पवारांना आधार वॉकरचा
पायाला दुखापत झाल्याने शरद पवारांवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. या दुखापतीमधून ते सावरत असले तरी आणखी काही दिवस त्यांना आराम करावा लागणार आहे. मात्र ऊस व साखरेचा महत्त्वाचा प्रश्न असल्याने त्याबाबत भूमिका मांडण्यासाठी ते गुरुवारी वॉकरच्या मदतीने पत्रकार परिषदेला आले होते.

घरवापसीचा ऐक्यावर परिणाम
‘दुस-या धर्मातील लोकांना पुन्हा हिंदू करण्याचा कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे. यामुळे सामाजिक तसेच राजकीय ऐक्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि ते देशासाठी योग्य ठरणार नाही’, असे शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे चांगले फोटोग्राफर
‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चांगले फोटोग्राफर आहेत. ठाकरे घराणे हे कलावंताचे असून उद्धव यांनी फोटोग्राफीत जास्तीत जास्त लक्ष घालावे म्हणजे महाराष्ट्राला त्याचा फायदाच होईल’, असा टोलाही पवारांनी लगावला. फोटोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करून उद्धव यांनी यामधून निर्माण झालेले पैसे दुष्काळग्रस्तांना दिले आहेत. याकडे लक्ष वेधले असता पवारांकडून असे उपरोधिक उत्तर मिळाले.