आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठीय संशोधनात बोलीभाषांना प्राधान्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - जागतिकीकरणाच्या रेट्यात स्थानिक भाषांवर गंडांतर येत असल्याची चिंता भाषातज्ज्ञांमध्ये व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातील विद्यापीठस्तरावर भाषेसंदर्भात होत असलेल्या संशोधनात विविध समूहांच्या परिचित-अपरिचित बोलीभाषांना विद्यार्थी अग्रक्रम देत असल्याचे समाधानकारक चित्र मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आले आहे.  
 
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषादिनाचे निमित्त साधून “दिव्य मराठी’च्या वतीने छापील आणि इंटरनेटच्या माध्यमातून सद्य:स्थितीत महाराष्ट्र आणि गोव्यात मराठी भाषेत होणारे संशोधन, या संशोधनाचे स्वरूप आणि परिणाम या अनुषंगाने खास लेखमाला प्रकाशित होत आहे.
 
याच लेखमालेसाठी  ‘दिव्य मराठी’ने सर्व नामांकित विद्यापीठांतील मराठी विभागप्रमुखांशी संपर्क साधून तत्संबंधी निरीक्षणे मागवली. त्यातूनच  बोलीभाषांशी निगडित संशोधनाच्या नव्या दिशा प्रकाशझोतात आल्या आहेत.  
 
“दिव्य मराठी’च्या इंटरनेट आवृत्तीमध्ये (www.http://divyamarathi.bhaskar.com) रविवार, २६ फेब्रुवारी रोजी प्रकाशित होत असलेल्या या विशेष लेखमालेतील लक्षवेधी बाब म्हणजे,  ज्ञानापासून वंचित राहिलेले ग्रामीण आणि आदिवासी वर्गातून पुढे येणारे विद्यार्थी भाषा संशोधनासाठी पुढाकार घेऊन तौलनिक तसेच समीक्षात्मक अभ्यासाबरोबरच  बोली भाषांच्या जतन-संवर्धनासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत.
 
 या घडीला अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वऱ्हाडी शब्दकोश, वऱ्हाडी म्हणींचा  कोश आणि वऱ्हाडी वाक्प्रचार कोश हे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत.  विद्यापीठात यापूर्वी कोरकू भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यासही झालेला आहे. उ. महाराष्ट्र विद्यापीठात मावची, गावित, पावरा या आदिवासी भाषांत संशोधन होत आहे. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी ‘वऱ्हाडी आणि अहिराणी बोलींमधील म्हणींचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर संशोधन करत आहेत.
  
बोलीभाषांचे होत असलेले हे संशोधन भाषेच्या भवितव्यासाठी मोलाची भूमिका बजावणार असून विद्यापीठे या संदर्भात मोलाचे योगदान देत असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
 
मालवणी, ठाकरी भाषेवर संशोधन  
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी मालवणी, ठाकरी, आगरी, शिंदी भंडारी, वसई परिसरातील सामवेदी , वाडवळ आणि ठाकरी, कातकरी, वारली व भिल्ली आदिवासी बोली बोलींचा अभ्यास करत आहेत. कोल्हापूर विद्यापीठातील विद्यार्थी चंदगडी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील बलुतेदारांच्या बोलीचा अभ्यास करत आहेत. गोवा विद्यापीठातील विद्यार्थी गोमंतकीय लोकनाट्याच्या अंगाने भाषेवर संशोधन करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...