आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: प्रदेश काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली; आमदार अनंत गाडगीळ यांनी पत्रातून फोडली वाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मुंबई काँग्रेसला सध्या बुरे दिन आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पक्षाची मते फुटल्याचे उघड झाल्याने काँग्रेसमधील अस्वस्थता आणखी वाढली आहे. राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी आमदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमधील गटबाजीसंदर्भात एक गोपनीय पत्र पाठवले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील लाथाळ्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे.  
 
काँग्रेसच्या बड्या नेत्यांत तर विसंवाद आहेच,  मात्र हे लोण आता प्रवक्त्यांपर्यंत पोहोचले आहे. प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांना अधिक झुकते माप दिले जाते, अशी राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची तक्रार आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या एकही सेल कार्यरत नसून निष्क्रियतेमुळे सर्व बारा सेल अशोक चव्हाण यांनी नुकतेच बरखास्त केले आहेत.    

अशाेक चव्हाण यांचा हात “आदर्श’ प्रकरणी अडकल्याने ते आक्रमक होत नाहीत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपविषयी ममत्व अधिक असल्याने त्यांचा आवाज फुटत नाही, अशी पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे आता काँग्रेसमध्ये नावालाच आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांना अशोकराव पक्षात स्पेस देत नाहीत, असा कसाबसा प्रदेश काँग्रेसचा गाडा सध्या चालला आहे.  प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांची धामधूम चालू आहे. आॅक्टोबरपर्यंत या सर्व निवडणुका होणे अपेक्षित आहे. नुकत्याच मुंबई युवक काँग्रेसच्या िनवडणुका पार पडल्या, त्या बोगस मतदानामुळे चांगल्याच वादग्रस्त ठरल्या आहेत.   

प्रदेशाध्यक्षपदाची दुसरी इनिंग िमळावी, असे अशोक चव्हाण यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण राष्ट्रपती निवडणुकीत पक्षाची मते फुटल्याने  काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर कर्जमाफीसंदर्भात शेतकऱ्यांचा विधिमंडळावर मोर्चा आणण्याचे काँग्रेसचे नियोजन चालले आहे. त्यानंतर चव्हाण राज्यातील संघटनात्मक बांधणीसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत.   

मुंबई काँग्रेसमध्ये अधिक गोंधळ  
काँग्रेसमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही, त्यापेक्षा मुंबई काँग्रेसमध्ये अधिक गोंधळ आहे. मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी संतमहंत परिषद स्थापन केली आहे. त्याला मुंबईतील नसीम खान आणि काँग्रेसच्या इतर मुस्लिम नेत्यांचा मोठा विरोध असून त्यासंदर्भात त्यांनी श्रेष्ठींकडे तक्रारही केली आहे.  आठवड्यातून दोन पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या काहीही घडत नाही आणि अशोक चव्हाण इतरांना काही करूही देत नाहीत, अशी काँग्रेसमधील इतरांची तक्रार आहे. तीच खदखद विधान परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या गोपनीय पत्राने समोर आली आहे. 

मते फुटली नाहीत : अशाेक चव्हाण, काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत. जे दावे करतात ते गोपनीयतेचा भंग करत अाहेत. असे खोटे दावे करून भाजप तोडफोडचीचे राजकारण करत आहे. त्यामुळे यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. काँग्रेस पक्षात सर्व ठीक असून आपण लवकर राज्याचा दौरा करणार आहोत. 
बातम्या आणखी आहेत...